भुकेने तडफडून चार बछडय़ांचा अंत

घनदाट जंगल.. त्यात आईचा ठावठिकाणा नाही.. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला..

एकाच वेळी चार पिल्लांना जन्म देणारी वाघीण तीन दिवसांपासून पाथरी परिसरातून बेपत्ता असल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्य़ातील घटनेने खळबळ
घनदाट जंगल.. त्यात आईचा ठावठिकाणा नाही.. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला.. मात्र, तो शमवायची ताकद नाही.. अशा परिस्थितीत सलग तीन दिवस भुकेने व्याकूळ झालेल्या अवघ्या चार महिन्यांच्या चार बछडय़ांचा करुण अंत झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्य़ातील पाथरी वन परिक्षेत्रातील नवेगाव बिटा येथे ही घटना घडली.
पाथरी येथून सात किमी अंतरावर असलेल्या आसोलमेंढा तलावाच्या उपकालव्याजवळ विरखल येथे रविवारी सकाळी आठच्या सुमारास गावकऱ्यांना वाघिणीची चार पिल्ले दिसली. यातील दोन पिल्लांचा आधीच मृत्यू झाला होता तर इतर दोघे अन्नपाण्यावाचून तडफडत होते. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पाथरीतील वनविकास महामंडळाला दिली. मात्र, त्यानंतर तब्बल अडीच तासांनी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. इतर दोन्ही पिल्लांना तातडीने पशुवैद्यक रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यादरम्यान तिसऱ्या पिल्लानेही मान टाकली. निदान चौथ्या पिल्लाचा तरी जीव वाचावा यासाठी त्याला पाथरीतील पशुवैद्यक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या पिल्लाला सिंदेवाही येथे नेण्यात आले. तेथेही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. अखेरीस तीन दिवसांपासून अन्नपाण्यावाचून तडफडणाऱ्या या पिल्लाला चंद्रपुरातील जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीर दामले व सहकाऱ्यांनी या चौथ्या पिल्लाला सलाइन लावली व दूधही पाजले. मात्र, तोवर उशीर झाला होता. उपचारादरम्यान या चौथ्या पिल्लाचाही करुण अंत झाला. घटनेचे वृत्त समजताच जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांच्यासह रुग्णालयाला भेट दिली. दूध व अन्नपाण्याविना चारही पिल्लांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वनविभागाचा सीमावाद
वाघिणीच्या चारही पिल्लांचा मृत्यू वनविभागाच्या क्षेत्रात झाला की, वनविकास महामंडळाच्या सीमेत, यावरच वनाअधिकारी बराच वेळ भांडत होते आणि एकमेकांकडे जबाबदारी झटकत होते. यानिमित्ताने या दोन्ही विभागांतील सीमावादही समोर आला आहे.

वाघीण बेपत्ता
एकाच वेळी चार पिल्लांना जन्म देणारी वाघीण तीन दिवसांपासून पाथरी परिसरातून बेपत्ता असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, पाथरी, सिंदेवाही व सावली या तिन्ही वनपरिक्षेत्र कार्यालयाला या परिसरात वाघीण व तिची चार पिल्ले असल्याची माहितीच नव्हती. आता ही पिल्ले मृतावस्थेत सापडल्यावर वन विभागाने वाघिणीचा शोध सुरू केला आहे. या वाघिणीच्या शोधासाठी परिसरात तातडीने कॅमेरा ट्रॅप लावण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले असून प्रसंगी नागपूर येथील विशेष पथकालाही पाचारण करण्याची सूचना करण्यात आली आहे. वाघ, वाघीण आणि तिच्या पिल्लांची जबाबदारी वन विभागाची असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत कुठल्याही हयगय नको, अशाही सूचना मुनगंटीवार यांनी दिल्या.
वाघिणीच्या शिकारीची शक्यता असेल तर त्या दृष्टीनेही तपास करावा, असेही निर्देश त्यांनी वनाधिकाऱ्यांना दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Four tiger chicks end of hunger