अहिल्यानगर: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) जयंत रामनाथ वाघ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अडीच वर्षांत राजीनामा देणारे जयंत वाघ चौथे जिल्हाध्यक्ष ठरले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर पुन्हा जिल्हाध्यक्ष शोधण्याची वेळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागले असतानाच आली आहे.
जयंत वाघ यांची नियुक्ती दीड वर्षांपूर्वी, फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली. त्यापूर्वी श्रीगोंद्यातील साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे जिल्हाध्यक्ष होते. मात्र त्यांनी सहा महिन्यांतच स्वतः सह त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी महिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. त्यापूर्वी काही दिवसांसाठी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र थोरात यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यापूर्वी बाळासाहेब साळुंखे मात्र सलग चार वर्ष जिल्हाध्यक्ष होते, मात्र त्यांनीही थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून केलेल्या बंडखोरीस पाठिंबा देत पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पदाचा राजीनामा देणारे वाघ ह चौथे जिल्हाध्यक्ष ठरले आहेत.
जयंत वाघ यांनी पदाचा राजीनामा थोरात यांच्यासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवून दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे व वेळेअभावी आपण पदाची जबाबदारी नीट पार पाडू शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद करत जबाबदारी टाकल्याबद्दल आभार मानले आहेत.
पक्षाचे यापूर्वीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही पदाचा राजीनामा देत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष पदही बराच काळापासून रिक्त होते. चार दिवसांपूर्वीच या पदावर माजी महापौर दीप चव्हाण यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. काँग्रेसची जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी विस्कळीत झाली आहे. ही बांधणी करण्याचे आव्हान बाळासाहेब थोरात यांच्यापुढे असतानाच जयंत वाघ यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पक्षाचे जिल्ह्यातील काही तालुकाध्यक्ष पदेही रिक्तच आहेत. संघटनात्मक बांधणीसाठी थोरात व वाघ यांनी जिल्हा दौरा सुरू केला होता, मात्र वरिष्ठ पातळीवर थोरात यांच्यावर अन्य जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याने हे दौरे अर्धवट पडले.