अकोले: आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना तालुक्यातील देवगाव येथे घडली. या प्रकरणी स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम करणाऱ्या दोन ठेकेदारांविरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवगाव हे क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे मूळ गाव. तेथे त्यांचे स्मारक आहे. आदिवासी समाजाचे हे श्रद्धास्थान असुन राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी लोक या स्मारकाला भेट देत असतात. सध्या या स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करताना ठेकेदाराने स्मारकात असणारा राघोजी भांगरे यांचा पुतळा चौथर्‍यावरून काढून बाजूच्या खोलीत ठेवला. हे करीत असताना झालेली हेळसांड स्मारकास भेट देण्यासाठी आलेल्या धामणवन येथील पोपट चौधरी या कार्यकर्त्याच्या लक्षात आली.

त्यानंतर इतरांना ही बाब समजली. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया आदिवासी समाजात उमटली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने राजूर पोलीस ठाण्यात जमा झाले. जिल्हा बँक संचालक अमित भांगरे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे, देवगावच्या सरपंच तुळसाबाई भांगरे, अनंत घाणे, पंढरीनाथ खाडे आदी कार्यकर्त्यांनी या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. पोपट चौधरी यांनी या संदर्भात फिर्याद दिली.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्हा आदिवासी महादेव कोळी समाजाचे तसेच सर्व आदिवासी समाज बांधवांचे आराध्य दैवत राघोजी भांगरे यांचा देवगाव येथे पुतळा बसविण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी पुतळ्याचे तसेच परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करत असताना ठेकेदार पांडे यांनी हा पुतळा बाजूला काढून ठेवला आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम सुरू आहे. या विभागाकडे चौकशी केली असता समजले की फक्त सुशोभीकरणाचे काम त्या विभागामार्फत सुरू असून पुतळा काढण्यासंदर्भात ठेकेदार यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा हा मुळ ठिकाणावरून काढण्याची कुठलीही परवानगी नसताना तसेच कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सदरचा पुतळा हा मुळ जागेवरून काढून तो राघोजी भांगरे सभागृहात गलिच्छ ठिकाणी ठेऊन तसेच पुतळ्याचे चबुतऱ्याचे नुकसान करून आदिवासी महादेव कोळी समाजाच्या आराध्य दैवताचा अवमान, विटंबना केली.

या फिर्यादीवरून राजूर पोलीस ठाण्यात दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राजूर पोलिसांनी आरोपी शैलेंद्र गणपत पांडे (वय ३५ रा. अकोले) या ठेकेदारास गुरुवारी अटक केली. आरोपी पांडे याला न्यायालयात हजार केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर दुसरा आरोपी फरार आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहेत.