Who is Kashish Methwani: जिद्द आणि मेहनत करायची तयारी असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर येत असतात. पुण्यातील कशिश मेथवानी या तरूणीने आजच्या युवा पिढीसमोर असेच एक ताजे उदाहरण प्रस्थापित केले आहे. २०२३ साली मिस इंटरनॅशनल इंडियाचा खिताब जिंकणारी कशिश मेथवानी थेट भारतीय लष्करात दाखल होणार आहे. ब्युटी क्वीनचा पुरस्कार मिळाल्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात लाल गालीचा अंथरलेला असताना कशिश मेथवानीने भारतीय लष्करात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशही मिळवले. तिच्या या कठोक परिश्रमाची चर्चा होऊ लागली आहे.
कशिशने नुकतेच टेडएक्सवर सहभाग घेतला होता. त्यात तिने आपली यशोगाथा मांडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एमएससी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथून न्यूरोसायन्समध्ये एमएससी प्रबंध लिहिलेल्या कशिशला आता भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून प्रवेश मिळाला आहे. आर्मी एअर डिफेन्समधील लेफ्टनंट कशिश मेथवानी अशी नवी ओळख आता तिला मिळाली आहे.
ब्युटी क्वीनचा खिताब जिंकल्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे २०२४ साली कशिशने कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेत भारतातून दुसरा क्रमांक पटकवला आणि चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये प्रवेश मिळवला.
कशिशची आई शोभा मेथवानी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, लहानपणापासून तिला शाळेत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्याची उत्सुकता होती. मला सर्व काही करायचे आहे, असे ती लहानपणापासून म्हणायची. साधारणपणे, पालक मुलांना निकालाची काळजी न करता विविध स्पर्धांत भाग घेण्यास उद्युक्त करत असतात. पण कशिश स्वतःच विविध सांस्कृतिक आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांत भाग घ्यायची आणि आम्हाला तिचा निकाल चांगला राहिल, असा दिलासा द्यायची.

कशिश मेथवानी कोण आहे?
लष्करात सामील होणारी कशिश तिच्या कुटुंबातील पहिलीच व्यक्ती आहे. तिचे वडील डॉ. गुरूमुख दास हे वैज्ञानिक असून सरंक्षण मंत्रालयाच्या डीजीक्यूए विभागातून निवृत्त झाले आहेत. आई शोभा या घोरपडी येथील लष्करी शाळेत शिक्षिका आहेत. कशिश आणि तिची बहीण शगुफ्ता यांनी लष्करी शाळेतून शिक्षण घेतले आणि दोघीही शैक्षणिकदृष्ट्या अतिशय बुद्धिवान आहेत.
२४ व्या वर्षी अनेक क्षेत्रात मिळवले यश
कशिशने शालेय जीवनापासूनच विविध क्षेत्रातील लीलया कामगिरी केली. ती राष्ट्रीय स्तरावरील पिस्तूल शूटर आणि बास्केटबॉल खेळाडू आहे. तबला वादन आणि भरतनाट्यम नृत्यामध्येही ती पारंगत आहे. कशिशने क्रिटिकल कॉज नावाची एक एनजीओही स्थापन केली असून या माध्यमातून ती प्लाझ्मा आणि अवयव दानाबाबत जागृती निर्माण करत असते. एवढे सगळे २४ व्या वर्षी साध्य करण्याची किमया कशिशने साधली आहे.
लष्करासाठी सौंदर्य पणाला लावलं
भारतीय लष्कारात प्रवेश करण्यापूर्वी कशिशची हार्वर्ड विद्यापीठात पीएचडीसाठी निवड झाली होती. मात्र तिने त्याऐवजी भारतीय लष्कराची निवड केली. ब्युटी क्वीन असलेल्या कशिशने सौंदर्याच्या ग्लॅमरस जगतातून एका वेगळ्या जगात प्रवेश केला. यावेळी तिला तिचे लांब केस कापावे लागले. तरी तिने कोणताही विचार न करता स्वतःला या नव्या भूमिकेत वाहून घेतले.
याबद्दल माहिती देताना कशिशची बहीण शगुफ्ता म्हणाली की, लहानपणापासूनच तिला प्रत्येक कामात उत्कृष्ठ कामगिरी करण्याची सवय आहे. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती सर्व अडथळ्यांना पार करत असते. तिला यशस्वी होताना पाहणे, आमच्यासाठी भावनिक क्षण आहे.