पंचगंगा नदी खोऱ्यातील वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी येथील प्रदूषण नियंत्रण कार्यालयावर मोर्चा काढला. प्रदूषणविरोधात सातत्याने आवाज उठवूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित घटकांवर प्रभावी कार्यवाही करत नसल्याने आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके यांना धारेवर धरले. प्रदूषणाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन संयुक्त बठक आयोजित करण्याची मागणी आंदोलकांनी केली. गेल्या आठवडय़ात एव्हीएच कंपनीच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी आंदोलकांनी या कार्यालयासमोर जोरदार िधगाणा घालून अधिका-यांना सळो की पळो करून सोडले होते. यामुळे आजच्या मोर्चावेळी पोलिसांनी विशेष दक्षता घेत आंदोलकांना कार्यालयाबाहेरच बॅरेकेटेड लावून रोखून धरले होते.
पंचगंगा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका नदीकाठची गावे, औद्योगिक वसाहती, साखर कारखाने यांच्याकडून नदी प्रदूषणात सतत भर पडत चालली आहे. नदी प्रदूषणामुळे आरोग्याला धोका उत्पन्न झाला आहे. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्या असून न्यायालयाने प्रदूषण रोखण्याबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून याबाबत कडक कारवाई होत नसल्याने नदीचे प्रदूषण वाढतच राहिले आहे. यामुळे जिल्ह्यात नदी प्रदूषणाविरोधात सातत्याने आंदोलने होत आहे. गेल्या आठवडय़ात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेंद्र होळकर हे शिरोळ तालुक्यात गेले असता तेथील आंदोलकांनी त्यांना नदी पात्रातील मृत माशांचा हार घालून धक्का-बुक्कीही केली होती. त्यानंतरही प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर मोर्चा काढला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, वैभव कांबळे, सुरेश पाचल, शैलेश चौगुले, विश्वास बालिघाटे, सागर चौगुले, यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांना कार्यालयाबाहेर रस्त्यावरच बॅरेकेटेड लावून पोलिसांनी रोखून धरले. मागील आंदोलनावेळचा गोंधळ लक्षात घेऊन मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. आंदोलकांपेक्षा पोलिसांचीच संख्या आणि पोलिसांची रोखण्याची तयारी अधिक दिसत होती. आंदोलकांनी डोके यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली. त्यानुसार डोके आंदोलकांजवळ आले पण बॅरेकेटडच्या पलिकडे सुरक्षित जागी उभे राहून संवाद साधू लागले. आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, नदीकाठची गावे यांचे सांडपाणी, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, रसायनयुक्त सांडपाणी याबाबत प्रशासनाने काय केले. याची विचारणा केली. डोके यांनी दिलेल्या उत्तरामुळे समाधान न झाल्यामुळे आंदालकांनी त्यांच्या दिशेने धावून जाण्याचा प्रयत्न केला. तो पोलिसांनी रोखून धरल्यानंतर आंदोलकांनी डोके यांच्या निषेधाच्या घोषणा देत ठिय्या रस्त्यावरच आंदोलन सुरू केले. चच्रेतून काहीही निष्पन्न होत नाही असे लक्षात आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व संबंधित घटकांची संयुक्त बठक बोलवून कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Front of swabhimani protest to growing pollution of panchaganga
First published on: 14-03-2015 at 03:30 IST