मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षांच्या आत घरे देण्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.  तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळुण तालुक्यातील अलोरे येथे मुंबईच्या सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचा संबंधित कुटुंबांना शुक्रवारी ताबा देण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करतांना उर्वरित घरांच्या बांधकामासाठी आवश्यक आणखी ७ कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी केली. त्याबाबतचा आराखडा आणि प्रस्ताव पाठवल्यास हा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,यावेळी  मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देताना आजुबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडण्याची शक्यता नाही याची काळजी घेण्याचीही गरज आहे. निसर्गाची ताकद मोठी आहे. निसर्ग लहरी होत आहे. अनियंत्रित अनियमित पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते, हे लक्षात घेऊन अशा प्रकारे घटना घडू नयेत म्हणून राज्यभर  सावधगिरी बाळगण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. कारण, वित्त हानी भरून काढता येते, परंतु मनुष्य हानी ही न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे हे आपले पहिले प्राधान्य आहे. आज आपल्या मनात संमिश्र भावना आहेत. एकीकडे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दुर्देवी लोकांच्या कुटुंबियांविषयी मनात सहवेदना आहे तर दुसरीकडे बाधितांना त्यांच्या हक्काचा निवारा आपण आज देत आहोत. या आपत्तीच्या प्रसंगात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. त्यात सिद्धीविनायक मंदिर न्यासाचाही सहभाग होता. त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनासाठी जी मदत केली त्या मदतीमुळे भाविकांनी मंदिरात केलेले दान सत्पात्री लागले आहे, असे म्हणता येईल.

कोविड काळात राज्यातील अनेक देवस्थानांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाला आणि थेट नागरिकांना केलेल्या मदतीचाही ठाकरे यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री अ‍ॅड् अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत, सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना तिवरे दुर्घटना,  नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी करण्यात आलेले सामुहिक व प्रशासकीय पातळीवरचे प्रयत्न इत्यादी बाबींचा आढावा घेतला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funds provide immediately for the remaining houses of tiware dam victims cm uddhav thackeray zws
First published on: 03-07-2021 at 01:45 IST