अकोले: ‘अमर रहे अमर रहे’, ‘शहीद संदीप गायकर अमर रहे’च्या निनादात, ‘भारतमाता की जय’च्या जयघोषात आणि हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान संदीप गायकर यांना आज, शनिवारी अखेरचा निरोप देण्यात आला. ब्राह्मणवाडा येथील ज्या विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले, त्या सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेकांना अश्रू अनावर झाले, तर संदीपचे वृद्ध आई-वडील आणि पत्नीचा आक्रोश पाहून उपस्थित गहिवरले.

जम्मू-काश्मीरमधील किश्टवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू असताना झालेल्या चकमकीत ब्राह्मणवाडाचे (ता. अकोले) भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. संदीप गायकर (वय ३२) लष्कराच्या १५ मराठा लाइट इन्फण्ट्रीमधील १७ राष्ट्रीय रायफल्समध्ये सैनिक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी त्यांचे पार्थिव ब्राह्मणवाडा येथे आणण्यात आले. लष्कर व स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

भारतीय लष्कराच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. ‘भारत माता की जय’ व ‘शहीद जवान संदीप गायकर अमर रहें’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुलगा रिहांस याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार वैभव पिचड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोरडे, लष्कराच्या वतीने कर्नल केतन प्रसाद आदींनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद संदीप गायकर यांना श्रद्धांजली वाहिली.

ब्राह्मणवाडा येथे स्मारक

संदीप गायकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ब्राह्मणवाडा येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात प्रशासन सहभागी असून, कुटुंबीयांना शासन सर्वतोपरी मदत करेल, अशा शब्दांत पालकमंत्री विखे पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.

एकुलता एक

जवान संदीप गायकर यांचे शालेय शिक्षण ब्राह्मणवाडा येथे झाले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वयाच्या २० व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले. एकुलता मुलगा असतानाही वडिलांनी त्यांना सैन्यात पाठवले. त्यांनी गांधीनगर, जम्मू व काश्मीरमधील पुंछ सेक्टर, ५६ राष्ट्रीय रायफल्स, मध्य प्रदेशमधील घाना सागर व युनायटेड नेशन येथे सेवा बजावली. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी व दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक गावांत बंद पाळून श्रद्धांजली

अंत्यसंस्कारास उपस्थित असलेल्या अनेकांनी आज एकाच वेळेला दुःख आणि अभिमान अशी संमिश्र भावना अनुभवली. ब्राह्मणवाडा गावात पाच दिवस दुखवटा पाळण्यात येणार आहे, तसेच काल व आज गावातील सर्व व्यवहार बंद होते. ब्राह्मणवाडा परिसरातील अनेक गावांमध्ये बंद पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.