आंतरजातीय विवाह केल्याने गडचिरोलीतील मुलीच्या कुटुंबाने विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवल्याची घटना सोमवारीच समोर आली. ही बातमी जेव्हा विवाहित मुलीपर्यंत पोहचली तेव्हा तिनेही तिच्या पतीसह विष प्राशन करुन पतीसह नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही त्यांचं आयुष्य संपवणारच होते. त्याचवेळी गडचिरोली पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचून या दोघांचे प्राण वाचवले. चार्मोशी तालुक्यात असलेल्या पोहर नदीत हे नवदाम्पत्य उडी मारुन जीव देणार होते. मात्र पोलिसांनी या दोघांनाही वाचवलं. या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंदनगर या ठिकाणी राहणाऱ्या रवींद्र वरगंटीवार, त्यांची पत्नी वैशाली आणि मुलगा साई या तिघांनी शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्याची बाब या कुटुंबाला सहन झाली नाही. त्याचमुळे या मुलीच्या कुटुंबीयांनी आत्महत्या केली. रवींद्र वरगंटीवार यांच्या संमतीशिवाय त्यांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केला अशी फिर्याद भावेश वरगंटीवार याने दिली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोहचून पोलिसांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी हे तिन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले.

ही घटना नुकतेच लग्न झालेल्या वरगंटीवार यांच्या मुलीला समजली. आपण लग्न केल्याने कुटुंबाने आत्महत्या केली ही बाब समजल्याने हे दोघेही तणावात होते. वरगंटीवार यांच्या मुलीने आणि तिच्या पतीने सोशल मीडियावर आत्महत्या करणार असल्याची ऑडिओ क्लीप पोस्ट केली. त्यानंतर ते घरातून निघून गेले. ही बाब गडचिरोली पोलिसांना समजली. त्यानंतर तातडीने या दोघांचा शोध पोलिसांनी सुरु केला. पोलीस या दोघांना शोधत असतानाच हे दोघे चार्मोशी येथील पोहर नदीजवळ असल्याचे त्यांना समजले. दोघांनीही विषारी औषध घेतलं होतं. त्यानंतर ते नदीत उडी मारुन आयुष्य संपवणार होते. मात्र वेळीच जाऊन पोलिसांनी या दोघांचा जीव वाचवला. या दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली या ठिकाणी दाखल कऱण्यात आलं आहे. या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे असंही समजतं आहे. गडचिरोली पोलीस पुढील घटनेचा तपास करत आहेत.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli girl also trying to suicide with her husband when she knows about her family suicide scj
First published on: 10-02-2020 at 23:04 IST