गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात बलात्कार प्रकरणातील आरोपीला जातपंचायतीने गावाला मटणाची पार्टी देण्याचा दंड सुनावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जातपंचायतीच्या पाच जणांना अटक केली असून राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धानोरा तालुक्यातील मोहली येथे राहणाऱ्या पाचवीतील मुलीवीर अनिल मडवी या नराधमाने बलात्कार केला होता. नराधमाने पीडित मुलीला घरी सोडतो असे सांगत तिला निर्जनस्थळी नेले. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. घरी परतल्यावर मुलीने आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. आई-वडिलांनी पोलिसांकडे जाण्याऐवजी हे प्रकरण जातपंचायतीकडे नेले. जातपंचायतीने अनिलला गावाला मटण पार्टी देण्याचा आणि पीडित मुलीला उपचारासाठी १२ हजार रुपये देण्याचा दंड सुनावला. तिकडे उपचार न मिळाल्याने पीडित मुलीची प्रकृती खालावली. आई- वडिलांनी हे प्रकरण पुन्हा जात पंचायतीसमोर आणले. जातपंचायतीच्या पंचांनी आई-वडिलांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.

आई- वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीवर कारवाई झाली. या प्रकरणात जातपंचायतीचाही सहभाग असल्याचे भूमकाल संघटनेने उघड केले. पीडितेवर अन्याय करणाऱ्या जातपंचायतीवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली. आता पोलिसांनी जात पंचायतीच्या पाच पंचांना अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.

राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून यासंबंधीचा कार्य अहवाल पाठवण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाने गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये ( एमपीडीए) अंतर्गत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच अल्पवयीन मुलीचे समुपदेशन करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli rape on 5th standard girl in dhanora jat panchayat fine mutton party to accused 5 arrested
First published on: 09-02-2018 at 11:44 IST