सांगली : ‘मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’चा गजर करत ढोल-ताशांच्या निनादात बुधवारी मोठ्या उत्साहाने श्रींचे स्वागत झाल्यानंतर गणेशोत्सवास सुरुवात झाली. गणरायाच्या आगमनाला बुधवारी सकाळीच हलक्या पावसाने हजेरी लावली असली तरी दिवसभर केवळ ढगाळ हवामान राहिल्याने गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते.

मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. सांगली संस्थान गणेशाची राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये तर मिरज संस्थानच्या गणेशाचे किल्ला भागातील माधव मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. संस्थान गणेशाचा उत्सव पाच दिवस चालणार आहे, तर तासगावचा ऐतिहासिक गणेशाचा रथोत्सव उद्या गुरुवारी साजरा होत आहे.

गेले पंधरा दिवस तयारीत गेले असताना आज श्रींच्या मूर्तीचे आगमनही गणेशभक्तांनी अत्यंत जोषात व उत्साहात केले. सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील सेवा रस्त्यावर गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. या ठिकाणाहून अनेक भाविकांनी आपल्या घरगुती पूजेसाठी श्रींच्या मूर्ती मिरवणुकीने नेल्या.

सकाळपासून या ठिकाणी गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. बालगोपालांनीही गणेशमूर्ती पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी पालकासोबत गर्दी केली होती. झांज पथक, ढोल, बेेंजो, बॅण्ड पथक यांच्या निनादात फटाक्याची आताषबाजी करत श्रींच्या मूर्तीचे स्वागत करण्यात येत होते. श्रींच्या मूर्ती घरी नेण्यासाठी काहींनी सजावटीच्या खास वाहनांची व्यवस्था केली होती.

सांगली व मिरज शहरात दुर्वा, आघाडा, फुले, फळे हे पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी आजही मोठी गर्दी होती. सांगलीतील मारूती रोड, हरभट रोड, कापड पेठ, विश्रामबाग गणेश मंदिर, मिरजेतील लक्ष्मी मार्केट, सराफ कट्टा आदी भागात विक्रेत्यांचे स्टॉल लावण्यात आले होते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगलीतील गणेश मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून या ठिकाणीही भाविकांची दर्शनासाठी रात्री दहा वाजेपर्यंत गर्दी होती. संस्थान गणेशाची राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये विधीवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी राजे विजयसिंह पटवर्धन व कुटुंबीय यांच्यासह युवा शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले, दिगंबर जाधव यांच्यासह मानकरी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरबार हॉलमध्ये पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारपर्यंत घरगुती गणेशमूर्तींचे आगमन झाल्यानंतर सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन मिरवणुकांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या. मिरवणुकीत झांज पथक, ढोल-ताशा यांचा समावेश होता. तसेच काही मंडळांच्या मिरवणुकीत ध्वनिक्षेपक भिंतींचाही वापर करण्यात आला होता.