अलिबाग- रायगड जिल्ह्यातील पेण हे गणेशमुर्तींचे गाव म्हणून ओळखले जाते. पेण शहर आणि हमरापूर जोहे लगतच्या परिसरात गणेशमुर्ती बनविण्याचे काम वर्षभर सुरू असते, आकर्षक रंगसंगती आणि सुबक मुर्तींसाठी देशाविदेशातून येथील गणेशमुर्तींना मोठी मागणी असते. ज्यामाध्यमातून दरवर्षी जवळपास १०० कोटींची उलाढाल होते. २० ते २५ हजार लोकांना ज्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असतो. पेणच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या या व्यवसायाची सुरवात नेमकी कशी झाली याचा हा थोडक्यात आढावा.
पेण शहरात गणेशमूर्ती व्यवसायाची दिडशेहून अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. पण पेण मध्ये गणेशमुर्ती बनविण्याच्या कामाला कशी कशी झाली आणि कोणी केली याची माहीती उपलब्ध नाही. मात्र पेण मधे पुर्वी जोशी टिळक आणि परांजपे यांच्या सारखे काही वतनदार लोक राहत होते. त्यांच्याकडे विजापुरहून आलेले काही कारागीर काम करत होते. आपले कामकाज आटोपल्यावर हे लोक फावल्या वेळात मातीची खेळणी, भांडी आणि मूर्ती बनवत असत. या वस्तुंना चांगली मागणी मिळत असे. कोकणात जाणारे प्रवासी या वस्तु व मूर्ती पेणमधुन घेऊन जात असत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव परंपरेला सुरवात केल्यानंतर या मूर्ती कलेला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. मातीची खेळणी, भांडी हळुहळू बंद होत गेली आणि गणेश मुर्ती बनवण्याची कला नावारुपास आला. पेण मधे घरासमोरील मातीतुन छोट्या आणि सुबक गणेश मूर्ती तयार होऊ लागल्या, याच दरम्यान कोकणात गणेशोत्सवाचे महत्व वाढत गेल्याने पेणच्या गणेश मूर्तींना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे सांगितले जाते.
जाणकारांच्या मते पेणचे कै.वामनराव देवधर आणि कै. राजाभाऊ देवधर हे दोघे पेणच्यागणेश मुर्ती व्यवसायाचे जनक मानले जातात. देवधरांच्या चार पिढ्या या व्यवसायत कार्यरत आहे. आजही श्रीकांत देवधर, आनंद देवधर या व्यवसायाची धुरा संभाळत आहेत. अनेक मुर्तीकार त्यांनी घडवले आहे. देवधर कुटूंबाने सुरवातीला या व्यवसायाला चालना दिली. पुढे त्यांच्याकडे शिकणार्या काही कारागिरांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केले. आणि हा व्यवसाय भरभराटीस येत गेला. सुबक मूर्ती आणि आकर्शक रंगसंगती मुळे पेणच्या गणेश मूर्तींची मागणी वाढत गेली. सुरवातीला कोकण, त्यानंतर मुंबई पुण्यात पेणच्या गणेशमूर्ती जायला लागल्या. हळुहळू राज्यभरातुन पेणच्या गणेशमूर्तींना मागणी येण्यास सुरवात झाली.
गेल्या काही दशकात या मूर्तींची लोकप्रियता इतकी वाढली की कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातूनही पेणच्या गणेश मुर्तीना नवीन बाजारपेठ उपलब्ध झाली. नंतर देशभरात पेणच्या गणेशमूर्ती जाऊ लागल्या. अगदी अलिकडच्या काळात थायलँण्ड, अमेरीका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि मॉरेशिअस या देशांमधे स्थायिक झालेल्या भारतीय लोकांकडून आता पेणच्या गणेश मूर्तीनां मोठी मागणी व्हायला लागली आहे. सुरवातीला पेण शहरापूरता मर्यादीत असलेला हा व्यवसाय हळूहळू आसपासच्या परिसरात विस्तारीत होत गेला. त्यामुळे गणेशमूर्ती बनवणाऱ्या कार्यशाळा संख्या देखील वाढत गेली.
आज जोहे, हमरापुर, दादर, वडखळ या परीसरातही गणेशमूर्तींचे अनेक कारखाने सुरु झाले आहेत. कच्च्या गणेश मूर्तींची मोठी बाजारपेठ म्हणुन जोहे हमरापुर परिसराकडे पाहिले जाऊ लागले आहे. राज्यभरातील मूर्तीकार येथिल कच्च्या मूर्ती विकत घेण्यासाठी दाखल होऊ लागले आहेत. तालुक्यात गणेशमूर्ती बनविण्याऱ्या लहानमोठ्या ५०० हून अधिक कार्यशाळा सुरू झाल्या आहेत. ज्यातून दरवर्षी साधारपणे ३० लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात, ज्यातून २५ हजार लोकांना रोजगार संधी उपलब्ध होते. जगभरात पेणच्या गणेशमूर्तींचें ब्रँण्डींग झाल्याचे पहायला मिळत आहे.