सातारा : ग्रामीण युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गरवारे युवा विकास केंद्र (जी.वाय.डी.सी.) यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या कौशल्यविकास उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. सीएनसी मशिन ऑपरेटर कोर्स अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या २० उमेदवारांपैकी तब्बल १३ जणांची नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वी निवड झाली असून, यामुळे तालुक्यातील तरुणाईसाठी रोजगाराचे नवीन दार खुले झाले आहे.

या उमेदवारांपैकी १२ जणांची निवड हाय-टेक इंजिनीअर्स लि., तर एका उमेदवाराची निवड आकार एंटरप्रायझेस या कंपनीत झाली आहे. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार प्रशिक्षण, उद्योगांची गरज ओळखून प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव व रोजगार मिळवून देणे हा या कोर्सचा प्रमुख हेतू असून, यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. गरवारे टेक्निकल फायबर्स लि.च्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या (सी.एस.आर) माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेवा सहयोग फाउंडेशन या संस्थेने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी केली.

स्थानिक युवकांना उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यात या दोन संस्थांचे मोलाचे योगदान आहे. सीएनसी मशिन ऑपरेटर कोर्समध्ये उमेदवारांना आधुनिक यंत्रसामग्रीवरील प्रत्यक्ष प्रशिक्षण, कामकाजातील शिस्त, सुरक्षेचे नियम, गुणवत्तावाढ व उत्पादनक्षमता याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये मुलाखत घेण्यात आली. त्यात १३ जणांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर निवड मिळवली. यामुळे केवळ उमेदवारांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनाही दिलासा मिळाला. ग्रामीण भागातील युवकांसाठी स्वावलंबनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या यशाबद्दल निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी, उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी, कार्यकारी व्यवस्थापक युवराज थाेरात, तसेच सेवा सहयोग फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

ग्रामीण युवकांना योग्य प्रशिक्षण आवश्यक

ग्रामीण युवकांना योग्य प्रशिक्षण दिल्यास ते सक्षमपणे उद्योगविश्वात आपले स्थान निर्माण करू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुढील काळातही अशा अनेक कौशल्य विकास उपक्रमांद्वारे अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असे गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी यांनी सांगितले.