Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील अशी ख्याती असलेली नृ्त्य कलाकार गौतमी पाटील ही तिच्या विविध प्रकारच्या नृत्यांसाठी आणि लावण्यांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये तिच्या नृत्याचे कार्यक्रम होत असतात. ३० सप्टेंबरला एक घटना घडली. गौतमी पाटीलच्या क्रेटा कारने एका रिक्षाला पुण्यातील नवले पुलावर धडक दिली. यावरुन वाद निर्माण झाला आहे. गौतमी पाटीलने आपण त्या कारमध्ये नव्हतो असं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच सतत ट्रोल केलं जातं म्हणून खंतही व्यक्त केली आहे. दरम्यान वाद आणि गौतमी पाटील यांचं नातं हे काही आजचं नाही. आपण जाणून घेऊ तिच्या आयुष्यातले वाद काय आहेत.

लावणीच्या नावाखाली अश्लील नाच केल्याचा वाद

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षीपासून गौतमी पाटीलने नाच करण्यास सुरुवात केली. लोक गौतमीला लावणी डान्सर म्हणतात पण गौतमी मात्र स्वतःला DJ डान्सर म्हणत असते. कारण लावणीच्या नावाखाली गौतमी अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकवेळा तिच्यावर झाला आहे. त्यामुळेच गौतमी स्वतःला DJ Dancer असं म्हणत असते. गौतमी पाटीलच्या डान्स शोमुळे अनेक वाद ही झाले, अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर टीकाही केली पण तिच्या डान्स शो ची गर्दी काही कमी झाली नाही. उलट दिवसेंदिवस ही गर्दी वाढतच चालली आहे. कारण आता महिला सुद्धा तिच्या या डान्स शो ला उपस्थित राहतात. आणि अनेकवेळा असंही दिसले आहे की अनेक महिला गौतमीच्या डान्स शो वेळी सर्वांत पुढे बसून गौतमीला कोणताही तरुण त्रास देणार नाही याची काळजी घेतात.

Gautami Patil
गौतमी पाटील आणि वादांचं नातं जुनंच आहे. सुरुवातीला तिच्यावर अश्लील नाच करत असल्याचा आरोप झाला. तिने या प्रकरणात चूक मान्य करत माफीही मागितली. (सर्व फोटो सौजन्य-गौतमी पाटील, इन्स्टाग्राम पेज)

८ मे २०२३ ला काय घडलं होतं?

छत्रपती संभाजीनगरात ८ मे २०२३ रोजी वैजापूरच्या महालगाव येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम भरला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. कार्यक्रम बघण्यासाठी मिळेल त्या जागेवर बसून किंवा उभे राहून प्रेक्षक गौतमी पाटीलच्या डान्सचा आनंद घेत होते. काही प्रेक्षक तर एका दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर दाटीवाटीने गोळा झाले होते. टाळ्या आणि शिट्या वाजवत उपस्थित प्रेक्षक प्रतिसाद देत होते. मात्र अचानक भार जास्त झाल्यामुळे पत्रा वाकला आणि कोसळला आणि पत्र्याच्या शेडवर बसलेले प्रेक्षक धाडकन जमिनीवर पडले.त्यावरुन वाद निर्माण होता. त्यावेळी गौतमी पाटीलच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती.

Gautami patil
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आत्तापर्यंत अनेक वाद झाले आहेत. त्यामुळे तिची चर्चाही झाली आहे.

तरुणाने वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केल्याने वाद

पिंपरी चिंचवड मधील कासारवाडी येथील अमित लांडे या युवा कार्यकर्त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. मात्र तरी देखील लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामुळे भोसरी पोलिसांनी लांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कार्यक्रमाची २०२३ मध्ये चर्चा झाली होती आणि स्थानिक पातळीवर वादही झाला होता.

Gautami Patil
गौतमीच्या नाशिकच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण झाली होती. त्यानंतरही बराच वाद निर्माण झाला होता.

नाशिकमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण

नाशिकमधील एका एनजीओने रुग्णवाहिकेसाठी पैसे गोळा करण्यासाठी गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम मे २०२३ मध्ये आयोजित केला होता. त्यावेळी कार्यक्रम तब्बल दोन तास उशिराने सुरू झाल्याने उपस्थित प्रेक्षक आधीच संतापलेले होते. कार्यक्रमात पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. परंतु गौतमी पाटील डान्स करत असताना काही पत्रकार व्हिडिओ घेण्यासाठी स्टेजजवळ गेले असता त्यावरून काही तरुणांनी दमदाटी करायला सुरुवात केली. आरोपींनी पत्रकारांचे पाय खाली ओढून त्यांना खाली पाडलं. तसंच त्यांना मारहाण देखील करण्यात आली. या गोंधळात पत्रकारांच्या कॅमेऱ्यांचं नुकसान झालं. या प्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. या कार्यक्रमावरुनही गौतमी पाटीलवर बरीच टीका झाली होती आणि तिला ट्रोलही करण्यात आलं होतं.

गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज यांचा वाद काय?

गौतमी पाटील बाबत इंदुरीकर महाराजांनीही एक वक्तव्य केलं होतं. महाराज म्हणाले होते, “आम्ही पाच हजार मागितले तर पैशांचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे गौतमी पाटीलच्या तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षणही दिलं जात नाही.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गौतमीने याबाबत स्पष्टीकरणही दिलं होतं. माझ्यावर जसं प्रेक्षक प्रेम करतात तसंच इंदुरीकर महाराजांवरही करतात. असं म्हणत तिने या प्रकरणी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण गौतमीचं मानधन आहे तरी किती याचं उत्तर देणं टाळलं होतं. त्यामुळे तिचं मानधन किती आहे? ती किती पैसे घेते हे प्रश्न उपस्थित करत वाद निर्माण झाला होता.

Gautami Patil
गौतमी पाटीलच्या मानधनाविषयी इंदुरीकर महाराजांनी प्रश्न उपस्थित केले होते.

गौतमी पाटीलचा एमएमएस लिक झाला आणि वादही झालाच

लोकप्रिय लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर २०२३ मध्ये लीक झाला होता. एका कार्यक्रमात ती चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे चित्रीकरण केले होते आणि तो व्हिडिओ लीक केला. तिच्या गटातील एका सदस्याने पोलिस तक्रार दाखल केली आहे आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354-सी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार अज्ञात गुन्हेगाराविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून देखील गंभीर दखल घेण्यात आली होती. यावरुनही गौतमी चर्चेत आली होती तसंच आरोप-प्रत्यारोप होऊन वादही रंगला होता.

Gautami Patil
गौतमी पाटीलने लावणी भ्रष्ट केली अशी खंत लोक कलेचे अभ्यासक गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केली होती.

गौतमी पाटीलबाबत गणेश चंदनशिवे काय म्हणाले होते?

गौतमी पाटील आणि तिच्या नृत्यप्रकाराबद्दल बोलताना डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले की,”मध्यंतरी गौतमी पाटीलसारखी मुलगी आली. मुळात गौतमी लावणी करत नसून आयटम साँग करते. लोकांनी ते लावणीवर खपवलं आहे. त्यामुळे लावणी भ्रष्ट झाली. ज्या लावणीमुळे एवढा मोठा इतिहास दिला आहे. त्या लावणीला कुठेतरी एक डाग लागल्यासारखा झाला. पुढे तिच्यावर टीका होऊ लागली तेव्हा तिने स्वत: मान्य केलं की ती लावणी करत नाही.”