गंगा, यमुना असो  किंवा सरस्वती, भारतीय संस्कृतीत नदीला नेहमीच आईची उपमा व दर्जा देण्यात आलेला आहे. त्याचं कारण सरळ आहे. पुरातन काळापासून मानवी संस्कृती ही अशाच नद्यांच्या खोऱ्यात आणि काठावर जन्माला आली, वाढली आणि फोफावली. महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक म्हणजे भीमा. भीमाशंकर मध्ये उगम पावणारी ही नदी एकूण साडेआठशे किलोमीटर  प्रवाहित होऊन शेवटी कृष्णेला जाऊन मिळते. पंढरपूरजवळ चंद्राचा आकार घेणाऱ्या तिच्या पात्राला चंद्रभागा म्हणण्यात येतं. आता पहिल्यांदाच या नदीच्या खोऱ्यांचा भूगोल, पर्यावरण, प्राणीसृष्टी, इतिहास, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलव्यवस्थापन यांच्याबाबत महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर विभाग पहिल्यांदाच एक विशेष आवृत्ती काढणार आहे.

गॅझेटिअर विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव दिलीप बलसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार विभागाने यापूर्वी एखाद्या नदीच्या खोऱ्यावरचा अहवाल काढला तो २०१३ मध्ये प्रवरेच्या खोर्‍यावर. हे मूळ गॅझेट मराठीमध्ये होतं. हा अहवाल इंग्रजीतदेखील येईल.”याच धर्तीवर भीमेच्या खोर्‍यावर आम्ही एक गॅझेट काढणार आहोत,” असे बलसेकर म्हणाले.

या गॅझेटमध्ये भीमा खोरे, तिथला भूगोल, पर्यावरण, प्राणीसृष्टी, संस्कृती, लोकजीवन, साहित्य, सामाजिक, इतिहास, प्रागैतिहासिक काळ, पुरातन काळ, मध्ययुगीन काळ, आधुनिक काळ, सामाजिक जीवन, पाहण्यासारखी ठिकाणे, उपनद्या व उजनी धरण असे विभाग असतील.

“महत्त्वाची गोष्ट अशी, की याच्यात जलव्यवस्थापन अवर एक विभाग असेल. यात भूजल व भूगर्भातील साठा, पाण्याची उपलब्धता व वापर, सध्याचे वास्तव व २०६० पर्यंतचा वेध यावर लेखन असेल. जल व्यवस्थापनामध्ये सध्याचा एकंदरीत पाणीसाठा, योग्य नियोजन, लोकजीवन, पीक पद्धती, याचाही आढावा घेण्यात येईल,” असे बलसेकर म्हणाले. या पुस्तकामुळे पुणे, सोलापूर यासारख्या मोठ्या जिल्ह्यांमधून जाणाऱ्या व सीना, निरा, भोगवती, या सारख्या उपनद्या असणाऱ्या या भीमा नदीचा सांगोपांग सामाजिक, भौगोलिक इतिहास वाचकांसमोर येईल. गॅझेटिअर विभागाचे दोन प्रकारचे गॅझेट असतात. एक, जिल्हा गॅझेट, दुसरा स्टेट गॅझेट. स्टेट गॅझेट मध्ये इतिहास, जीवसृष्टी, राजकारण, सामाजिक, राजकीय, आर्थिक व भौगोलिक विषयांचा समावेश असतो. त्यात असलेल्या प्रचंड माहितीमुळे हे गॅझेट अभ्यासक सरकारी अधिकारी व सर्वसामान्यांसाठी सुद्धा महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ ठरतात.