नांदेड : भूगोलाबाबत उदासीनता हे इतिहास आणि वर्तमानातील समस्यांचे मूळ असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर डॉ. अनुराग लव्हेकर यांनी लिहिलेले ‘वसुंधरेचे शोधयात्री’ हे पुस्तक महत्त्वाचे असून भूगोलाचा इतिहास माहीत नाही अशांना हा इतिहास कळावा यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक तथा चतुरस्र लेखक गिरीश कुबेर यांनी येथे केले.

पचनसंस्था विकारतज्ज्ञ डॉ. अनुराग लव्हेकर यांनी पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोधनायकांची विखुरलेली माहिती संकलित करून लिहिलेल्या ‘वसुंधरेचे शोधयात्री’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘भूगोलकोष’कार एल. के. कुलकर्णी होते. या वेळी व्यासपीठावर पत्रकार संजीव कुळकर्णी, डॉ. राहुल लव्हेकर, डॉ. अमरजा लव्हेकर आदींची उपस्थिती होती. 

या वेळी  कुबेर म्हणाले की, भूगोलाकडे चाळीस गुणांचा पेपर याच दृष्टिकोनातून पाहिले जाते. या विषयाची गंमत कुणाला कळलीच नाही. वाईट पद्धतीने या विषयाची ओळख सर्वाना करून दिली जाते. भूगोलाचे ज्ञान नसणे व त्याचे परिणाम खूप गंभीर आहेत. त्या अज्ञानाची किंमत आपण किती देत आहोत, याचा गंधही आपल्याला नाही. जगण्याचे संदर्भ माहीत करण्याचे काम भूगोल शिकवते. छत्रपती शिवाजी महाराज भूगोलामध्ये निष्णात होते म्हणूनच त्यांना अफजलखान, शाहिस्तेखान यांच्याबरोबरच्या युद्धकारवाया यशस्वी करता आल्या.

भूगोल कळणारे व भूगोलाबाबत मठ्ठ असणारे अशी दोन भागांत विभागणी करता येईल. देशाचा नकाशा कळणार नाही तोपर्यंत देशावर प्रेम करू शकणार नाही, असे माओंनी म्हटले होते. डॉ. अनुराग लव्हेकर यांनी भूगोल जाणणारा अभ्यासक काय करू शकतो हे दाखवून दिले आहे, असे ते या वेळी म्हणाले.

आपल्याला आपला भूगोलच माहिती नव्हता म्हणून आपण आक्रमणे केली नाहीत. स्वत:ला शांततावादी म्हणवून घेतले आहे. जगात सर्वात जास्त आयटी तंत्रज्ञ भारतातून तयार होऊन जातात. आपण स्वत: काही उभारत नाही, निर्मिती करत नाही तर केवळ दुसऱ्याने उभारलेल्याची राखण करतो, असे म्हणत त्यांनी भारतीयांच्या न्यूनगंडाबाबत अप्रत्यक्षरीत्या प्रहारच केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूगोल माहीत असला की, मोठमोठी स्वप्ने सुचतात व सत्यात येतात. भूगोलाचा अभ्यास करण्याची सवय लागली तर जाणिवा विस्तारायला मदत होती. ज्ञानाचा प्रसार करणारी पुस्तके लिहिली गेली पाहिजेत. शुद्ध मराठीमध्ये लिहिण्याची फार मोठी परंपरा आपल्याला लाभली आहे. आपला इतिहास कळवून घ्यायचा असेल तर भूगोल माहिती असावा लागतो. त्यासाठी ‘वसुंधरेचे शोधयात्री’ हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे. भूगोलाकडे लोकांचे लक्ष वेधावे हा या पुस्तकाचा उद्देश आहे, असे गिरीश कुबेर या वेळी म्हणाले. एल. के. कुलकर्णी यांचेही समयोचित भाषण पुस्तक प्रकाशनच्या निमित्ताने झाले. प्रास्ताविक डॉ. अमरजा लव्हेकर यांनी केले तर, डॉ. अनुराग लव्हेकर यांनी मनोगत व्यक्त करताना पुस्तकाच्या निर्मितीची गोष्ट सांगितली.