उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आज माझ्याकडं अर्थखात असल्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं अर्थखातं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "अजित पवार यांना डावललं जात असल्याची भावना त्यांच्या मनात दिसत आहे. म्हणून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली," असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. खडसेंच्या विधानाला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना घट्ट धरून राहावे," असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे. हेही वाचा : “शरद पवार कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही”, शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान गिरीश महाजन म्हणाले, "एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करू नये. राष्ट्रवादीत राहिलेले सुद्धा आमच्याकडं येत आहेत. तुम्ही शरद पवार यांना घट्ट धरून राहा. आमच्याकडं येण्यासाठी फार हात पाय जोडू नका. अजित पवार यांच्याबरोबर येण्यासाठी एकनाथ खडसे काय करत आहेत, याची मला कल्पना आहे." हेही वाचा : “अपात्रतेबाबतच्या कारवाईसाठी लागेल तेवढा वेळ घेणार”, नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले… अजित पवार काय म्हणाले? बारामतीत एक कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, "आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखात आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथे चूका होत असतील, तर दुरूस्त केल्या पाहिजेत."