श्रीरामपूर : शहरात मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्लय़ात जखमी झालेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मसिरा अमजद कुरेशी (रा. वार्ड R. २) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
मसिरा ही नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या अंगणात खेळत होती. याचवेळी रस्त्यावरू जाणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या टोळीतील काही कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढविला. या कुत्र्यांनी तिला खाली पाडून तिच्या चेहऱ्याचे लचके तोडले होते. गंभीर जखमी झालेल्या मसिरा हिला प्रथम श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय व तेथून पुढे नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. नगर येथे उपचार घेतल्यानंतर तिला उर्वरित उपचारासाठी येथील संतलुक रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी तिचे उपचार पूर्ण झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. आठवडाभरानंतर तिला पुन्हा ताप व झटके येऊ लागल्याने संतलुक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहत तिला पुणे येथील डॉ. नायडू यांचे संसर्ग रोगाचे रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
योग्य उपचार न झाल्याने व पालिकेला वारंवार कळवूनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे वडील अमजद कुरेशी यांनी केला आहे. याबाबत आपल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून अनेकांना कुत्र्याने चावा घेतलेला आहे. या कुत्र्यांचा पालिकेने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.