सांगली : शांतिनिकेतनमधील थोरात अकादमीमध्ये वृक्षाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने शनिवारी रक्षाबंधन मुलींनी साजरे केले. भाऊ बहिणीचे अनोखे नाते निसर्गासोबत सुद्धा जपण्याचा एक प्रयत्न थोरात अकादमीच्या विद्यार्थिनींनी शनिवारी केला. शाळेतील विद्यार्थिनींनी वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. त्याचबरोबर शाळेमध्ये 400 हून अधिक विद्यार्थ्यांना राखी बांधून हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय बामणे, सर्व अध्यापक, परिवेक्षक संजय कुमार खंडागळे, अकादमीच्या प्रभारी डॉ. समिता पाटील, शाळा प्रभारी व संस्थेचे उपसंचालक डी. एस. माने संस्थेचे संचालक गौतम पाटील उपस्थित होते.

दरम्यान, मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात सुरक्षाबंधन या कार्यक्रमाचे आयोजन सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले होते. यावेळी उप अधिक्षक प्रणिल गिल्डा यांनी उपस्थित माता-भगिनींना पोलीसांशी मैत्री करायला सांगा असे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले, पोलीसांशी मैत्री केली तर मुले नको त्या विकृत प्रवृत्तीच्या संपर्कात येणार नाहीत. मुलांना चांगले वळण, चांगल्या सवयी लागतील. ज्यामुळे त्याचे भविष्य अधिक उज्वल आणि नीतीमान बनेल.

पोलीस काका-पोलीस दीदी व पोलीस जनता सुसंवाद या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळभ् मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील,उप निरीक्षक रूपाली गायकवाड, संदीप गुरव यांच्यासह पोलीस कर्मचारी, मिरज शहरातील सामाजिक संस्था, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी महिलांना पोलीसांना राख्या बांधल्या.

महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मिरज शासकीय रूग्णालयातील सफाई कर्मचारी, आणि सावली बेघर वसाहतीमध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे, प्रदेश सरचिटणीस अनिताताई पांगम, मिरज शहराध्यक्षा शारदा माळी, कुपवाड शहराध्यक्षा प्रियांका विचारे, रईसा चिंचणीकर, दीपाली हारगे, सविता कोरे आदी सहभागी झाल्या होत्या.