राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आली. त्यानुसार महामंडळाने १७ मार्चपासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली आहे. याचा राज्यातल्या महिला लाभ घेऊ लागल्या आहेत. दरम्यान, आता महिलांना स्वयंपाकाच्या गॅसवर ५० टक्के अनुदान द्यावं अशी मागणी ‘बिग बॉस’ या टीव्हीवरील कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिजीत बिचुकले यांनी केली आहे.
बिचुकले म्हणाले की, राज्य सरकारने राज्यातल्या महिलांना एसटीच्या तिकिटात ५० टक्के सवलत दिली आहे, याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु आमच्या माता भगिनी केवळ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत नाहीत. त्यांना घरदेखील सांभाळावं लागतं. त्यांना घरी पती, मुलं, सासू-सासऱ्यांसाठी स्वयंपाक करावा लागतो. त्यांचा जो सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे स्वंयपाक. गोरगरीब जनतेसाठी सिलेंडरचा प्रश्न महत्त्वाचा आहे.
हे ही वाचा >> राहुल गांधींवरील कारवाईची अमेरिकेतही दखल, भारतीय वंशांचे खासदार म्हणाले, “हा गांधीवादी…”
“सिलेंडरवर ५० टक्के अनुदान द्या”
बिचुकले राज्य सरकारला म्हणाले की, “हाच गॅस सिलेंडर तुम्ही जर १,२०० रुपयांना विकत असाल आणि लोकांना सांगत असाल एसटीने फिरा तर हे सगळं हास्यास्पद आहे. बिचुकले म्हणाले की, माझी राज्य शासनाला सूचना आहे की, ताबडतोब त्यानी अनुदान कोट्यातून गॅस सिलेंडरला ५० टक्के सबसिडी द्यावी. कारण हा माझ्या माता भगिनींचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिलं आहे.”