कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. आता गुरुवारी अध्यक्ष निवडीसाठी बैठक आयोजित केली आहे. शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदासाठी निवड निश्चित करण्यात आली आहे.
गोकुळचे अध्यक्ष डोंगळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेचा हवाला देत ‘गोकुळ’मध्ये महायुतीचा अध्यक्ष करायचा असल्याने राजीनामा देणार नाही, असे विधान केल्याने ‘गोकुळ’च्या राजकारणाला वेगळेच वळण लागले.
तथापि महायुतीमध्ये असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी फटकारल्यानंतर डोंगळे यांनी सुपुत्र अभिषेक यास जिल्हा परिषदेतून निवडून आणण्याचा शब्द मुश्रीफ यांच्याकडून घेवून सशर्त माघार घेत आज कार्यकारी अध्यक्ष योगेश गोडबोले यांच्याकडे राजीनामा सादर केला.
वारसदारास संधी
दुसरीकडे ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी कोण याची चर्चा सुरू असताना सर्वसंमतीचा चेहरा म्हणून शशिकांत पाटील यांच्या नावावर एकमत झाले आहे. आनंदराव पाटील चुयेकर यांनीच विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना गोकुळ दूध संघात संधी दिली होती. त्यामुळे त्यांच्यासह कोणाचाच त्यांचे वारसदार शशिकांत यांच्या नावाला विरोध नाही. ते सतेज पाटील समर्थक संचालक म्हणून ओळखले जातात.