गोंडवाना विद्यापीठाने २०१५-१६ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला असून यात १६९ कोटी ४४ लाख ९४ हजार रुपयांचा खर्च होणार असल्याचा अंदाज दर्शवण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या अंदाजपत्रकात ११ कोटी ५८ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विद्यापीठातील सायन्स अॅन्ड टेक्नालॉजी रिसोर्स सेंटरच्या (एमटीआरसी) विकासाकरिता १४ कोटी ६८ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ासाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मागील वर्षी विद्यापीठाने १३२ कोटी ९६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात १५७ कोटी ८४ लाख रुपयांचा खर्च झाला. यावर्षी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात वाढ झाली असून १६९ कोटी ४४ लाख ९४ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
विद्यापीठाला १६९ कोटी २२ लाख १८ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. विद्यापीठाला मुदत ठेव, दान निधी, अग्रिमवरील व्याज, राखीव इमारत निधीवरील व्याजापोटी १ कोटी १८ लाख, कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानासाठी शासनाकडून ९ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांकडून संलग्नीकरण शुल्क, प्रस्ताव शुल्क, वार्षिक संलग्नीकरण शुल्कातून १ कोटी ४२ लाख, विद्यार्थ्यांकडून विविध प्रमाणपत्रांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून १ कोटी ३५ लीाख, परीक्षा शुल्काच्या माध्यमातून ९ कोटी ३७ लाख, मानवशास्त्र विभाग, स्वयंरोजगार योजना विभाग, निरंतर प्रौढ शिक्षण विभागाच्या माध्यमातून १९ कोटी, इतर विभागाकडून ९ कोटी ५० लाख, इमारत भाडय़ातून ३ कोटी, वेतनोत्तर अनुदानाच्या माध्यमातून ५ कोटी व इतर गुंतवणुकीतून २५ कोटी, आवर्ती व अनावर्ती उत्पन्नाच्या माध्यमातून ५५ कोटी १२ लाख रुपये प्राप्त होणार आहे. या प्राप्त उत्पन्नातून शिक्षक व शिक्षकेत्तर वेतनावर ९ कोटी १५ लाख, प्रशासकीय खर्चावर ४ कोटी ८६ लाख, परीक्षेसाठी ७ कोटी २२ लाख, पदव्युत्तर शिक्षण विभागासाठी १५ लाख ८० हजार, इमारत दुरुस्ती, परिसर सुशोभीकरणावर ३ कोटी ५२ लाख, शारीरिक शिक्षण विभागावर ६४ लाख, विद्यार्थी कल्याण कार्यक्रमांतर्गत युवक महोत्सव, विद्यार्थ्यांचे गणवेश, प्रवास खर्च, उपकरण दुरुस्ती व खरेदीवर ३१ लाख, विद्यापीठाच्या ग्रंथालयावर २५ लाख, संगणक खरेदी, दूरध्वनी खर्च यावर ३० लाख, निरंतर प्रौढ शिक्षण विभागावर ५ लाखांचा निधी खर्च होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2015 रोजी प्रकाशित
गोंडवाना विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात २४.४८ कोटींनी वाढ
गोंडवाना विद्यापीठाने २०१५-१६ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला असून यात १६९ कोटी ४४ लाख ९४ हजार रुपयांचा खर्च होणार असल्याचा अंदाज दर्शवण्यात आला आहे.
First published on: 15-04-2015 at 07:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gondwana university get more fund