रायगड जिल्ह्य़ातील माणगाव व तळा या दोन तालुक्यांत वसतिगृहे मंजूर झाली असून या वसतिगृहातून चांगले विद्यार्थी-विद्यार्थिनी निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा या वेळी राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री ना. सुनील तटकरे यांनी माणगाव तालुक्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली. माणगाव तालुक्यातील लोणशी मोहल्ला सामाजिक सभागृहाचे, जावळी हायस्कूललगत स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे, जावळी नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे, सामाजिक न्याय विभागाकरिता मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह व शाळेच्या इमारतीचे बांधकाम या सर्व कामांचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी माणगाव पंचायत समितीच्या सभापती अलका केकाणे, माणगाव पंचायत समितीचे उपसभापती सुभाष केकाणे, माणगाव पंचायत समितीच्या सदस्या संगीता बक्कक, अ‍ॅड. राजीव साबळे, बाबूरावभोनकर, माजी आमदार अशोक साबळे, लोणशी ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रेय जुमारे, महादेव बक्कम, सौ. सुखदा धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना तटकरे म्हणाले, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे. या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींची माहिती संकलित केली पाहिजे. ते भविष्यात काय करू शकतात याची माहिती मिळाल्यावर चौफेर विविध क्षेत्रांतील संधीची त्यांना माहिती दिली तर योग्य प्रकारे चांगली पिढी घडू शकते. ते पुढे म्हणाले, ही सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. आमदार निधीतून जास्तीत जास्त निधी देऊन माणगाव तालुक्याचा विकास झपाटय़ाने होत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक कार्यकारी अभियंता रंगारे यांनी केले. तर सूत्रसंचालन राजीव शिर्के यांनी केले. या वेळी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी तसेच विविध शासकीय अधिकारी, लोणशी, जावळी ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच ग्रामस्थ, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.