|| विजय पाटील
पोलीस, प्रतिष्ठान, ग्रामस्थही उदासीन
‘सुधारककार’ गोपाळ गणेश आगरकर यांच्या टेंभू येथील पुतळय़ाची विटंबना घडून दोन दिवस उलटले तरीही या गुन्ह्य़ाबाबत शनिवारी सायंकाळी उशीरापर्यंत कराड ग्रामीण पोलिसांकडे कसलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. पत्रकारांनी विचारणा केल्यावर या घटनेबाबत तक्रार दाखल करत तपास सुरू करणार असल्याचे निवेदन पोलिसांकडून देण्यात आले. पोलिसांबरोबरच ग्रामस्थ आणि पुतळय़ाची देखभाल पाहणाऱ्या आगरकर प्रतिष्ठान या साऱ्यांनीच या प्रश्नी मौन बाळगल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते असलेले गोपाळ गणेश आगरकर यांची टेंभू ही जन्मभूमी. या गावातीलच काही जणांनी आगरकर प्रतिष्ठानची स्थापना करून त्यांच्या नावाने गावात वाचनालय व विद्यालय चालवले आहे. गावाच्या एका बाजूस असलेल्या या शाळेच्या प्रांगणात २००३ मध्ये आगरकरांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. आगरकर प्रतिष्ठान या पुतळय़ाची देखभाल करीत आहे.
शुक्रवारी सकाळी या पुतळय़ाची मोडतोड झाल्याचे हायस्कूलच्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. यानंतर हा प्रकार ग्रामस्थांपर्यंत लगेचच पोचला. झाला प्रकार गांभीर्याने घेऊन आगरकर प्रतिष्ठानने विटंबना झालेला पुतळा झाकून टाकला. तसेच या वेळी पुतळा चबुतऱ्याची डागडुजी व रंगकाम सुरू असल्याने तो झाकून ठेवण्यात आल्याचा कागद घटनास्थळी चिकटवण्यात आला. दरम्यान, विटंबना झालेल्या पुतळय़ाचे छायाचित्र व त्यासंदर्भातील माहिती समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने वृत्तपत्र व सामाजिक क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. परंतु, या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतरही गावचे सरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठानचे प्रतिनिधी अथवा पोलिसांनी स्वत: अशी कोणीही पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही.
लवकरच तपास!
पुतळा विटंबनेच्या प्रकाराबाबत विचारणा केली असता कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी लवकरच तक्रार दाखल करत तपास सुरू करणार असल्याचे सांगितले. सध्या पुतळय़ाच्या ठिकाणी दक्षता म्हणून पोलीस तैनात करण्याच आल्याचेही त्यांनी सांगितले. तर कराड उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी या पुतळय़ाविषयी पोलिसांकडे कसलीही नोंद नसल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.