राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. 

“तीन हजार कर्मचारी कामावर परतले, अशा खोट्या बातम्या अनिल परब वृत्तपत्रात पसरवत आहेत आणि कर्मचाऱ्यांमध्ये फुट पाडून उद्रेक पसरवण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. अनिल परब खूप चांगले राजकारणी आहेत पण एसटी कर्मचाऱ्यांबाबत असे तुच्छ पद्धतीचे राजकारण त्यांनी करू नये. याचे रूपांतर कुठे हिंसाचारामध्ये किंवा आत्महत्येमध्ये झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील”, अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली.  

“अनिल परब यांच्या असंवदेनशीलपणामुळे ३६ जणांनी जीव गमावले आहेत. तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या दुखा:ची जाणीव त्यांना झाली नाही. आपणास विनंती आहे की संवेदनशीलता पाळा व लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या, कृपया कुठल्याही पद्धतीचे तुच्छ राजकारण करू नये”, असेही पडळकर म्हणाले.