गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात एका जाहिरातीमुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकांची पसंती असल्याचं एका सर्वेमधून समोर आल्याचा दावा करणारी जाहिरात प्रकाशित झाली होती. यावरून भाजपा आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारबद्दल भविष्यवाणी केली आहे.

येत्या दोन महिन्यांत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. राऊतांच्या या दाव्याची भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांनी केवळ तीन शब्दांत उत्तर दिलं आहे. राऊतांच्या दाव्याबाबत विचारलं असता गोपीचंद पडळकर यांनी “अरे येडाय रे” असं अवघ्या तीन शब्दांत उत्तर दिलं. राऊतांच्या दाव्यावर सविस्तर बोलणं पडळकरांनी टाळलं आहे. ते जालना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवर संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाने सरकारी जाहिरातीतून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो वगळला आहे. आज जाहिरातीच चित्र स्पष्ट असलं तरी सर्व काही आलबेल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्षांनी काहीही म्हटलं तरी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसारच निर्णय द्यावा लागेल. हे सरकार अपात्र ठरेल आणि हे सरकार दोन महिन्यात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल.

हेही वाचा- “बेडूक फुगतो की सुजतो, हे…” अनिल बोंडेंच्या टीकेला भरत गोगावलेंचं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जो बूंद से गई, वो हौद से नहीं आएगी”

“जो बूंद से गई, वो हौदसे नहीं आएगी. त्यांच्या (शिंदे गट) मनात काय आहे ते काल स्पष्ट झालं. त्यांचे बाळासाहेब ठाकरे नाहीत, आनंद दिघे नाहीत, त्यांचे फडणवीसही नाहीत हे काल स्पष्ट झालं. पण काल फडणवीसांनी तंबी दिल्यामुळे आज किमान जाहिरातीत तरी चित्र बदललेलं दिसत असलं, तरी प्रत्यक्षात सगळं आलबेल नाही हे स्पष्ट दिसतंय”, असंही संजय राऊत म्हणाले.