अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांसह २ जुलै रोजी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी दिल्लीत बोलत होते.

धनगर आरक्षण आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. पण, अजित पवारांना पत्र लिहिलं नाही. याबद्दल प्रश्न विचारल्यावर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

“अजित पवारांना आम्ही मानत नाही”

गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.”

“…म्हणून धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही”

“मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाची भाजपाने फसवणूक केली आहे,” असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. यावरही पडळकरांनी टीकास्र सोडलं आहे. “ही लबाड लांडग्याची लेक बोलत आहे. धनगर समाजाने तुमच्या पालख्या वागवल्या. लोकांच्या चपला फाटल्या, तरी तुमच्या वडिलांनी, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडं पाहिलं नाही. त्यामुळे धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांची भावना…”

“सुप्रिया सुळे, शरद पवार किंवा अजित पवार काय बोलले, याला काडीचीही किंमत देत नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांची भावना पोटात एक आणि ओठावर एक असते. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नाही,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.