दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनी दुपारी पावणे दोनच्या सुमारास पार्थिवाला मुखाग्नी दिला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या प्रांगणावर लोटला आहे. बुधवारी पावणे बाराच्या सुमारास हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मुंडे यांचे पार्थिव लातूरहून परळीला आणण्यात आले. पार्थिव हेलिकॉप्टरवरून फुलांनी सजविलेल्या गाडीवर ठेवण्यात आल्यानंतर लोकांनी त्याभोवती गर्दी केली. अमर रहे… अमर रहे… मुंडेसाहेब अमर रहे…, परत या… परत या… मुंडेसाहेब परत या… अशा घोषणा यावेळी जनसमुदायातून देण्यात येत होत्या. पार्थिव गाडीतून व्यासपीठावर ठेवण्यात आल्यावरही अनेकांनी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली. गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पंकजा मुंडे या स्वतः कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी हेसुद्धा कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंडे यांच्या अंत्यविधीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह विविध पक्षांचे राज्यातील नेते उपस्थित आहेत. संपूर्ण बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांतून अनेक लोक मुंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी येथे आले आहेत.
बुधवारी सकाळी हवाई दलाच्या विशेष विमानाने मुंबईहून लातूर येथे आणण्यात आले. मुंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लातूरकरांनी यावेळी विमानतळाबाहेर गर्दी केली होती. मुंडे यांचे पार्थिव विमानतळावरून हैलिकॉप्टरने लगेचच परळीला नेण्यात येणार होते. मात्र, असंख्य कार्यकर्त्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे थोड्यावेळासाठी पार्थिव विमानतळाबाहेर आणण्यात आले. तेथे तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर पार्थिव ठेवण्यात आले आणि लातूरकरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath mundes mortal remains being taken to a chopper which will fly to his village parli
First published on: 04-06-2014 at 10:39 IST