जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्राभर सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत. विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. हे शासकीय कर्मचारी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी करत मुंडन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वारंवार सरकारकडे मागणी करूनदेखील सरकार कोणत्याच पद्धतीची पावले उचलत नसल्यामुळे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे मुंडन आंदोलन करण्यात आल्याचे शंतनू गायकवाड यांनी सांगितले. सध्या सोलापुरातील महापालिकेचे कर्मचारीही सरकारचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून आपलं काम करत आहेत. तर अन्य सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. चार दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही सरकार दखल घेतल नसल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

हेही वाचा- उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रही उत्पादन शुल्कातून ६० हजार कोटी उत्पन्न मिळवू शकतो; सत्यजीत तांबेंचा दावा

कर्मचारी समन्वय समितीचे समन्वयक शंतनू गायकवाड यावेळी म्हणाले, “आज आंदोलनाचा चौथा दिवस दिवस आहे. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही काल जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. आजपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. शासनाचा निषेध म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘मुंडन आंदोलन’ सुरू केलं आहे. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. तरीही सरकार आम्हाला कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी बोलावत नाहीये. सरकार जनतेला वेठीस धरत आहे. आम्हाला आंदोलन करण्याची मुळीच इच्छा नाही. पण सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलवावं, आम्ही सहा महिन्यात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करतो, असं दोन ओळींचं पत्र द्यावं, यानंतर अवघ्या पाच मिनिटांत आम्ही आंदोलन सोडायला तयार आहोत.”

हेही वाचा- “ती ऑडिओ रेकॉर्डिंग मी स्वत: केली”, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला जीवे मारण्याच्या कटाबद्दल मोठा खुलासा

“तरीही सरकारला जाग आली नाही. तर आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आम्ही ‘भीक मांगो’ आंदोलन करणार आहोत. त्यानंतर चौथा टप्पा म्हणून सामाजिक हित जपत आम्ही ‘रक्तदान शिबीर आंदोलन’ करणार आहोत. तरीही सरकारला जाग आली नाही, तर देशाचे पंतप्रधान मोदींनी थाळी वाजवून करोना घालवला होता. त्याप्रमाणे आम्ही कर्मचारी थाळी वाजवून पुढचा कार्यक्रम करणार आहोत,” अशी भूमिका शंतनू गायकवाड यांनी मांडली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt employee strike over demanding old pension scheme pm narendra modi rno news rmm
First published on: 17-03-2023 at 17:43 IST