राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महेश आहेर यांनी आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. याबाबतची एक ऑडिओ क्लिपही जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांना दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संपूर्ण घटनाक्रमानंतर जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. महेश आहेर हे आव्हाडांच्या मुलीला जीवे मारण्याचा कट रचत असताना ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करणाऱ्या सुशांत सुर्वे नावाच्या तरुणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. संबंधित व्हिडीओतून सुशांत सुर्वे यांनी जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला जीवे मारण्याच्या कटाबद्दल मोठा खुलासा केला आहे. संबंधित ऑडिओ रेकॉर्डिंग मी स्वत: केली, असा दावा सुशांत सुर्वे याने व्हिडीओद्वारे केला आहे. आव्हाडांनी स्वत: हा व्हिडीओ आणि सुशांत सुर्वे याचे प्रतिज्ञापत्रं शेअर केली आहेत.

संबंधित व्हिडीओ शेअर करताना जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले, “सोबतचा व्हिडीओ हा सुशांत सुर्वे ह्याने स्वतःहून दिलेला व्हिडीओ आहे. त्यामध्ये तो स्पष्टपणाने कबुली देतो की, जे भाष्य माझ्या मुलीबद्दल महेश आहेर याने केलेलं आहे, ते भाष्य आणि त्यांचे संपूर्ण रेकॉर्डिंग त्याने स्वतः केलेलं होतं. तसे त्याने सत्यप्रतिज्ञापत्रदेखील लिहून दिलं आहे. यापेक्षा अजून कोणता पुरावा पाहिजे?” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला.

हेही वाचा- “माझ्या मुलीला ठार मारण्याची…”, जितेंद्र आव्हाड यांचे महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप

“इतके सगळे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स बाहेर येतं आहेत. मुख्यमंत्र्यांशी मी टाईट होऊन बोललो, असं मुख्यमंत्र्यांना अपमानित करणारे भाष्य त्याच्या तोंडातून येत आहे. त्याची पोलिसांबद्दल आक्षेपार्ह विधाने येतं आहेत. त्याची मार्कशीटही खोटी असल्याचे स्पष्टपणे दिसून येतं आहे. महेश आहेरवर आपण कारवाई करावी, यासाठी अजून किती पुरावे आपल्याला हवे आहेत?” असंही आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये पुढे नमूद केलं की, “महेश आहेर याने जवळजवळ एक हजार घरं स्वतःच्या सहीने विकली. आता बोलताना तो म्हणतो की, ही सगळी घरं देण्यासाठी मी वरिष्ठांची परवानगी घेतली होती. म्हणजे एखाद्याने चोरी करायची आणि नंतर घरच्या सगळ्यांनाच त्याच्यामध्ये अडकवायचं, असा हा त्याचा प्रकार आहे. त्यामुळे सावध राहा… सगळे आयुक्त तसेच त्याच्या फाईलींवर सही करणारे सगळेच ह्या प्रकरणामध्ये अडचणीत येणार आहेत. तसेच डोळे बंद करून सह्या करण्याचा हा भोग त्यांना भोगावा लागणार आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life threat to jitendra awhad daughter sushant surve video mahesh aher rmm
First published on: 17-03-2023 at 16:18 IST