कराड : ढोल- ताशांच्या निनादात ‘मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’ असा एकच गजर करीत अन् गुलालाच्या उधळणीत गणभक्तांनी आपल्या लाडक्या श्री गणेशाच्या मूर्तींचे मोठ्या उत्साहात अन् दणक्यात आगमन केले. ‘श्रीं’च्या स्वागतात अवघी कराडनगरी गणेशमय झाली होती.
सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी दोन्ही कुंभारवाडे आणि मोठ्या मूर्तीं बनवण्यासाठी देण्यात आलेले बालाजी मंदिरासमोरील मैदान गर्दीने फुलून गेले होते. मंगलप्रभात समयी काहींनी गणेशमूर्तींचे आगमन केले. यानंतर दिवसभर हा आगमन सोहळा सलग सुरू होता. त्यात ‘कोणेगावचा महाराजा’ अन् ‘दुशेरेचा राजा’चे आगमन व मूर्तीही लक्षवेधी होत्या. रात्री उशिरापर्यंत गणेश मंडळांच्या मिरवणुका चालतील असे चित्र आहे. नजीकच्या काळात नगरपालिकांच्या निवडणुका असल्याने काही इच्छुक उमेदवारांनी गणेशमूर्ती आगमनासाठी स्वखर्चाने रिक्षा उपलब्ध करून दिल्या होत्या. तर, अनेक ठिकाणी स्वागताचे फलकही झळकावले आहेत.
शहरातील प्रत्येक चौकात आणि गल्लो- गल्लीत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष घुमत आहे. गणेश मंडळांनी आकर्षक फुले आणि विद्युत रोषणाईने ट्रॅक्टर- ट्रॉलीतील गणेशमूर्तींचे आसन, मखर सजवले गेले होते. एका पाठोपाठ एका नानाविध रूपातील गणेशमूर्तीचे होणारे दिमाखात आगमन आणि त्यातील गणरायाचा एकच जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण श्रध्दा अन् भक्तीत न्हाऊन निघाले होते. सायंकाळी उशिरा प्रमुख व मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ‘श्रीं’चे सवाद्य मिरवणुकांनी आगमन होणार आहे. शनिवार पेठेतील शिवाजी क्रीडा गणेश मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने त्यांनी भव्य आरास साकारताना, मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजिले आहेत. या मंडळाच्या व गजानन नाट्य मंडळाच्या गणेशमूर्तींचे रात्री उशिरा आगमन होणार आहे.
दरम्यान, कराडमधील गणेशोत्सव हा धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा उत्सव ठरवावा असे आवाहन पोलीस दल व शासकीय यंत्रणेने केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलीस प्रशासन सतर्क असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मिरवणुकांच्या पाश्वर्भूमीवर नेहमीप्रमाणे वाहतूक व्यवस्थेत बदलही करण्यात आला होता.
शाडूच्या मूर्तींना पसंती
या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य दिसत असून, शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींना प्लास्टरच्या तुलनेत किंमत जास्त असतानाही पसंदी मिळाल्याचे दिसत होते. तर, दुसरीकडे प्लास्टरच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्याने त्यांच्या विक्रेत्यांना त्याचा फटका बसला आहे. यंदा पारंपरिक गणेश मूर्तींसह, पौराणिक कथांवर आधारित आणि सामाजिक संदेश देणाऱ्या मूर्तींचाही समावेश दिसत आहे.