सावंतवाडी:मुंबई-गोवा महामार्गावर महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर असलेल्या बांदा-सटमटवाडी तपासणी नाक्यावर वृक्षारोपण आणि त्याच्या सुरू होण्याबाबत अनेक वाद सुरू आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने (NGT), पुणे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सीए साईप्रसाद कल्याणकर यांनी या प्रकरणी लवादाकडे तक्रार दाखल केली होती.

वृक्षारोपणासंदर्भात आदेश

प्रकल्पाच्या सुरुवातीला या परिसरात एकूण ४४,००० झाडे लावण्याचे आदेश होते. परंतु, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) केवळ १७,००० झाडे लावली. उर्वरित २७,००० झाडे लावण्याबाबत लवादाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि आरटीओ सिंधुदुर्ग यांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या अधिकाऱ्यांनी वृक्षारोपणासाठी योग्य जागेचा नकाशा न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कल्याणकर यांनी प्रशासनाला या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

तपासणी नाका अद्याप सुरू नाही

बांदा येथील सीमा तपासणी नाका तयार होऊनही तो अद्याप सुरू झालेला नाही. यामुळे सरकारी निधीचा अपव्यय होत असल्याचा मुद्दाही कल्याणकर यांनी उपस्थित केला आहे. या तपासणी नाक्याच्या उभारणीसाठी सपाटीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि गौण खनिज उत्खनन करण्यात आले होते. या विरोधात साईप्रसाद कल्याणकर सुरुवातीपासूनच लढा देत आहेत.या तपासणी नाक्याला टोल आकारणी सुरू करण्यास वाहनधारकांचा विरोध आहे.