राहाता : नागरिकांच्या समस्या, प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच शासनाच्या विरोधातील बातम्यांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकारी यांना तातडीने खुलासा करण्यासाठी प्रश्न सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणारी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. विखे यांच्या नव्या पॅटर्नचा धसका प्रशासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही विभागाच्या विरोधातील, दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे संबंधित विभागाच्या सचिवांनी लगेच खुलासा करून सरकारची बाजू मांडण्याचा आदेश यापूर्वीच काढला आहे. त्याच धर्तीवर पालकमंत्री विखे यांनी व्यक्तिगत स्तरावर दखल व पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.
एखाद्या विभागाचे नागरिकांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष, सार्वजनिक प्रश्न तसेच योजनांबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून होणारी अडवणूक आदी दैनंदिन बातम्यांची दखल घेवून, संबंधित विभागाला स्वत: विखे बातमीच्या कात्रणासह लेखी पत्र पाठवून खुलासा मागवतात किंवा समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश देत आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू केलेल्या या नव्या पॅटर्नमुळे संबंधित विभागांना कामाचा खुलासा किंवा बातमीबाबत म्हणणे मांडण्याची संधी मिळाली आहे. बातमी समवेत पाठवलेल्या पत्राचा पाठपुरावा मंत्री विखे यांच्या कार्यालयातून करण्यात येतो. तालुकास्तरीय कार्यालयांना पाठवलेल्या पत्राची प्रत जिल्हा, विभागीय कार्यालयांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येते.
तीन स्तरावरून या पत्रांवर पाठपुरावा केला जातो आहे. पालकमंत्री कार्यालयासही याचे खुलासे, नागरिकांचे प्रश्न निकाली लागल्याचे अहवाल प्राप्त होवू लागल्याने विखे यांच्या या नव्या पॅर्टनची चर्चा प्रशासनात सुरू झाली आहे. नागरिकांनाही त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा झाल्याचे समाधान आणि अनुभव या निमित्ताने येवू लागले आहे.