कराड : तारळी धरणावरील अपूर्ण उपसा जलसिंचन योजनांची कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण करावीत तसेच चोरीस गेलेल्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उपसा सिंचन योजनेतून शेतीला पाणी द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.पालकमंत्री देसाई यांनी तारळी धरणावरील उपसा सिंचन व मोरणा (गुरेघर) धरणांतर्गत सुरू बंदिस्त जलवाहिनीच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, तारळी धरणावरील पूर्ण झालेल्या उपसा सिंचन योजनेतून पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाणी मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. अशा उपसा सिंचन योजनेची पाहणी प्रत्येक गावातील पाच शेतकरी घेऊन पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी पुन्हा करावी. सर्वेक्षणात काही दुरुस्ती करावयाच्या आढळल्यास त्या तत्काळ कराव्यात, त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा. बांबवडे उपसा सिंचन योजना टप्पा दोन आणि तारळे उपसा सिंचन योजना टप्पा दोनची कामे ५० टक्के पूर्ण झाली आहेत. ही कामे मे महिना अखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच नाटोशी उपसा जलसिंचन योजनेंतर्गत असणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे. जमिनीमधून जलवाहिनी जात आहे, अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदल्यासह निर्वाह भत्ता येत्या १५ एप्रिलपर्यंत द्यावा. बंदिस्त जलवाहिनीच्या कामाला गती येण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाची मदत घ्यावी, असेही निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी बोलताना दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाचा उन्हाळा सर्वाधिक तप्त राहत असल्याचे चित्र असतानाच उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागेल तशी आवर्षणग्रस्त भागातून पाण्याची मागणी वाढू लागली आहे. अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई सातत्याने टंचाई आढावा घेत असून, त्यांनी पाणी योजनांना चालना देण्यासाठी प्राधान्यक्रम दिला आहे. त्याचाही एक भाग म्हणून तारळी धरणावरील उपसा सिंचन व मोरणा (गुरेघर) धरणांतर्गत बंदिस्त जलवाहिनीच्या कामांचा आढावा घेत या कामांना चालना देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला धारेवर धरले आहे. जलटंचाईला पालकमंत्री देसाई यांनी प्राधान्यक्रम दिल्याने पाण्यासाठी वणवण करणाऱ्या जनतेला दिलासा मिळाला आहे.