Raj – Uddhav Thackeray Victory Rally: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश सरकारने रद्द केल्यानंतर शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने वरळी डोम येथे आज विजयी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र येत आहेत. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत. मराठी लोकांबरोबरच काही गुजराती भाषिकांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
लोकसत्ताच्या टीमनं वरळी डोम येते उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मी गुजराती आहे, असे फलक हाती घेऊन उभा असलेला एक व्यक्ती दिसला. या व्यक्तीशी संवाद साधल्यानंतर त्याने सभेला उपस्थित राहण्याचे कारण सांगितले.
सदर व्यक्ती चांदिवलीमधून आल्याचे त्याने सांगितले. “मी महाराष्ट्रातला गुजराती मराठी आहे.
“जे मराठी भाषेचा अपमान करतात, त्यांना मी संदेश देण्यासाठी हातात फलक घेऊन आलो आहे. मीही गुजराती आहे. महाराष्ट्रात माझा जन्म झाला. ६० वर्षांपासून माझे कुटुंब महाराष्ट्रात राहत आहे. या राज्याने मला मान, सन्मान सर्व काही दिले. मग मराठीत बोलणार नाही, अशी भूमिका काही गुजराती बांधव घेतात. त्यांना संदेश देण्यासाठी मी इथे आलो आहे”, असे या व्यक्तीने सांगितले.
“मराठी भाषेचा सन्मान सर्वांनीच ठेवला पाहिजे. हा सन्मान अभिमानाने ठेवावा. घाबरून, भिऊन सन्मान करण्याची काही गरज नाही. तुम्हाला मराठी येत नसेल तर तसे सांगा. मला मराठी येत नाही, पण मी शिकण्याचा प्रयत्न करेन. असं बोलले तर मराठी माणूस तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. पण तुम्ही मराठीत खड्ड्यात गेली, असे म्हणालात तर कानाखाली आवाज नक्की काढला जाणार”, असेही या व्यक्तीने सांगितले.