अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनी शपथविधी घेऊन जवळपास दहा दिवस उलटले आहेत. १० दिवसानंतरही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून महायुतीच्या सरकारची गुंतागुंत वाढतच चालली आहे. हाच तिढा सोडवण्यासाठी आज अजित पवार व प्रफुल्ल पटेल दिल्लीला रवाना झाले आहेत. अजित पवार दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी मंत्रीमंडळ खातेवाटपावर चर्चा करणार आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य केलं आहे.

राज्य सरकारमध्ये अनेक नेते बिनखात्याचे मंत्री आहेत. मंत्रीमंडळ विस्ताराचं घोडं नेमकं कुठे आडलंय? असं विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, घोडं कुठेच आडलं नाही. आपलं घोडं सरळ चालतंय. काही गोष्टींचा निर्णय व्हायचा आहे. सत्तेत तीन वाटेकरी असल्याने थोड्याफार उणीवा राहणार आहेत. या उणीवा चर्चेनंतर सुटतील. यासाठी वेळ लागतो. याचा अर्थ असा नाही की, घोडं कुठेतरी आडलंय किंवा काहीच होणार नाही. येत्या एक-दोन दिवसांत निश्चितपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मला खात्री आहे, यामध्ये सगळ्यांना न्याय मिळेल.

हेही वाचा- “राज्यात तीन पक्षाचं सरकार, बिघाडीही होऊ शकते”, राजकीय हालचालींवरून बच्चू कडूंचं सूचक विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांना अर्थ खातं देण्यावरून शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांच्या नाराजीबद्दल विचारलं असता गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “हे पाहा, माझ्यासारख्या कार्यकर्त्याने हाच विचार केला पाहिजे की, वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील, तो निर्णय सगळ्या नेत्यांनी मान्य करायचा असतो. निर्णय घेण्यासाठी वरच्या स्तरावर लोक बसले आहेत. त्यामुळे कुणी मंत्री बनला किंवा कुणी अर्थमंत्री बनला तरी आपण काम करण्याची क्षमता ठेवावी. आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात काम कसं करायचं, हे आपल्या हातात आहे. मंत्री कुणीही बनू द्या, आपणही आमदार आहोत, आपल्यालाही लोकांनी निवडून दिलंय.” नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटलांनी हे भाष्य केलं आहे.