scorecardresearch

“पवारांची चावी कुठेही चालते”; गुलाबराव पाटलांचा टोला, म्हणाले, “त्यांनी उठोबा-बठोबा..”

जळगाव जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते संजय पवार विजयी झाले आहेत, त्यांचं गुलाबराव पाटील यांनी कौतुक केलं.

sharad pawar vs gulabrao patil
गुलाबराव पाटील यांनी संजय पवारांचं कौतुक करताना अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला लगावला.

अलिकडेच झालेल्या जळगाव जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते संजय पवार विजयी झाले. जळगाव जिल्हा बॅकेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रवींद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी आयत्या वेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. त्यानंतर गुप्त पद्धतीनं मतदान पार पडलं. यामध्ये संजय पवार विजयी झाले आहेत. याबद्दल काल (२५ मार्च) जळगावात बोलताना शिवसेना (शिंदे गट) नेते गुलाबराव पाटील म्हणाले, “संजय पवार कलाकार आहेत.”

गुलबराव पाटील म्हणाले की, कोणत्याही परिस्थिती आम्ही त्यांना साथ दिली, त्यांना १०० टक्के साथ दिली आहे. त्यावेळी आमचे सहा सदस्य आहेत, तुमचे सात आहेत हे त्यांना सांगितलं होतं. पण यांनी बरोबर सगळं जुळवून आणलं. माझा सांगायचा अर्थ असा आहे की, पवार हे कलाकार आहेत. शेवटी ते पवार आहेत. शरद पवार कसे चावी देतात. कधी ही चावी दे, तर कधी ती चावी दे. शरद पवारांची चावी कुठेही चालते. त्यांनी बरोबर काँग्रेसवाले पटवले. उठोबा-बठोबाचा एक माणूस पटवला आणि अशी मिसळ तयार झाली. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीबद्दल बोलत असताना गुलाबरावांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला लगावला.

हे ही वाचा >> “जागावाटपाचा फॉर्म्युला टीव्हीवर…” सुधीर मुनगंटीवारांचं शिंदे गटाला उत्तर, म्हणाले, “केंद्रात अमितभाई…”

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संजय पवार विजयी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाची संयुक्त सत्ता होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा, शिवसेनेच्या शिंदे गटाचे पाच, कॉंग्रेसचे तीन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन आणि भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शिंदे गटाचे आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडे बँकेचं नेतृत्व आहे. परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या पाठिंब्यावर संजय पवार विजयी झाले आणि एकनाथ खडसे तसेच अजित पवारांनी उभा केला उमेदवार पराभूत झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 09:20 IST

संबंधित बातम्या