जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली आहे. चोपडा येथे खासगी कार्यक्रमासाठी आले असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला .
खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, “त्यांनी लोकांना मुख्यमंत्री केले, आमच्यासारख्या लोकांना मंत्री केले आहे. त्यांना निवडणुकीस उभा राहण्याची गरज नाही. उभे राहण्याची गरज त्यांना(राणा दाम्पत्यास) आहे. ते निवडणुकीस उभा राहताना कोणत्या पक्षातून आले त्यांना मायबाप माहीत नव्हता त्या पक्षाचा, त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये. ”
राणा दाम्पत्यास माध्यमांशी बोलण्याची परवानगी नसताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, “त्यांनी सुरुवातीपासूनच कोर्टाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या शांततेच्या आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे आता अजून काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील, तर ते कोर्ट निश्चित पणाने बघेल. मुख्यमंत्र्यांवर, ठाकरे कुटुंबावर टीका करून त्यांना फक्त प्रसिद्धी मिळवायची आहे. ज्या प्रमाणे राज ठाकरेंनी भोगा काढला आणि भोंगा बंद पडला, तसा हिचा ही भोंगा बंद पडणार आहे. ”
राज ठाकरे आयोध्या दौऱ्यावर जात असल्याबाबत प्रतिक्रिया विचारल्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, “त्यांनी रामलल्लाचा चरणी जावं, बाळासाहेबांनी तिथे आपले शिवसैनिक पाठविले होते. शिवसैनिक तिथे गतप्राण झाले. शिवसैनिकांनी कारसेवा केली, त्या शिवसैनिकांची तिथे पावलं पडली त्याच्यावर नतमस्तक व्हावे हीच अपेक्षा आहे.”
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात एका कार्यक्रमात शिवसेनेवर टीका करतांना म्हटलं होतं की, लग्न आमच्याशी जुळलं होतं आणि पळून दुसऱ्यासोबत गेले. यावरून गुलाबराव पाटील म्हणाले की, “दानवे यांना बोलण्याचा अधिकार नाही. दानवेंना म्हणावं जळगाव ग्रामीण मतदारसंघांमध्ये मी उभा होतो, तेव्हा भाजपाचा बंडखोर उमेदवार उभा होता. तेव्हा तुमच्या भाजपावाल्यांनी कुणाशी लफडं केलं होतं? याचे उत्तर द्यावे.”