गेल्याच आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झालेला असतानाच आता गारपिटीने डोके वर काढले आहे. रविवारी रात्री मराठवाडय़ाला गारपिटीने झोडपून काढले. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्य़ांत गारपिटीचा जोर सर्वाधिक होता. अवकाळी पावसाच्या पाठोपाठ आलेल्या या गारपिटीमुळे शेतकरीवर्ग पुरता धास्तावला असून द्राक्ष बागांसह ज्वारी, हरभरा, गहू, पपई, डाळिंब, चिंच व आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ज्या भागाला गारपिटीने झोडपून काढले होते, त्याच गावांना याहीवेळी गारपिटीचाच फटका बसला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तुळजापूर तालुक्यातल रविवारी रात्री प्रचंड गारपीट झाली. तर लातूर जिल्ह्य़ात निलंगा, उद्गीर, देवणी व औसा तसेच नांदेड जिल्ह्य़ातील देगलूर, मुखेड, बिलोली व धर्माबाद शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ), नंदगाव, बोरगाव, सलगरा (म.), लोहगाव व गुजनूर या गावांनाही रविवारी रात्री गारपिटीने झोडपून काढले. कोकण वगळता मराठवाडय़ात गारपीट होऊ शकेल, असा इशारा हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीत दिला होता, हे विशेष. गारपीट व वादळी वाऱ्यामुळे अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याचे दृश्य मराठवाडय़ात होते.
मुखेडमध्ये अधिक नुकसान
नांदेड जिल्हय़ातील देगलूर, मुखेड व बिलोली तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. मुखेड तालुक्यातील गारपिटीचे प्रमाण अधिक असल्यामुळे या तालुक्यात शेतीचे नुकसानही अधिक असल्याचे सांगितले जाते. धर्माबाद शहरातही मोठा पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2015 रोजी प्रकाशित
अवकाळीच्या जोडीला गारपीट!
गेल्याच आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झालेला असतानाच आता गारपिटीने डोके वर काढले आहे. रविवारी रात्री मराठवाडय़ाला गारपिटीने झोडपून काढले.

First published on: 10-03-2015 at 03:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hailstorm along with unseasonal rain hits farmers