सांगली : सांगलीत दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात अवघ्या चार तासांत लाखांचा व्यवसाय झाल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. दिव्यांगांकडे असलेल्या कल्पनाशक्तीचा वापर स्वयंनिर्भर होण्यासाठी करावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकाराने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात जिल्ह्यातील २४ संस्थामधील दिव्यांग बांधवांनी स्वत: तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, दिवाळीतील सजावट साहित्य विक्रीसाठी उपलब्ध केले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजला येथे दिव्यांग व बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळीसाठीच्या वस्तुंच्या प्रदर्शनाचे संयुक्त उद्घाटन खासदार विशाल पाटील व जिल्हाधिकारी काकडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभाग पुणेचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अजयकुमार पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम, जिल्हाधिकारी यांच्या पत्नी शरदिनी काकडे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दिव्यांग व बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंच्या प्रदर्शनाला सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणावर भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच त्या वस्तु खरेदी करून प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्याच्या आधारे दिवाळी सजावटीच्या केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. याच्यातून भविष्यातील सांगली, जे आमचे व्हीजन २०३० आहे, ते घडविण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे.
दिव्यांग व्यक्तीचे कौशल्य विकसित करून त्याला स्वावलंबी बनवणे यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी काकडे यांनी दिव्यांग व्यक्तीमध्ये असलेल्या कौशल्याबरोबरच त्यांना व्यावहारिक ज्ञान देण्याची गरज आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ तर उपलब्ध होणार आहे याचबरोबर दिव्यांगांचा आत्मविश्वासही वाढणार असल्याचे श्री. काकडे यांनी यावेळी सांगितले.
प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रदर्शनात २४ संस्थांतील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. या प्रदर्शनात दिव्यांग, बालगृहातील मुलांनी तयार केलेल्या विविध सजावटीच्या, शोभेच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंच्या विक्रीतून दिवसभरात १ लाख २ हजार ७५७ रुपये जमा झाले.