ठाण्यातील येथील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर सिनेमागृहात बसलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने वादाचे प्रसंगही घडले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनानंतर ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक अभिजीत देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संबंधित घटनेचा निषेध केला असून खरी शिवभक्ती काय असते? ते राज ठाकरेंकडून शिका, असा टोला लगावला आहे.

अभिजीत देशपांडेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “ठाणे येथील ‘हर हर महादेव’च्या ‘शो’मध्ये घुसून सामान्य मराठी प्रेक्षकावर भ्याड हल्ला केल्याबद्दल ‘हर हर महादेव’ची पूर्ण टीम ह्या विकृत गुंडांचा निषेध करते. माझ्या छत्रपतींवर राजकारण खेळणं बंद करा आणि त्यांचे दैवी विचार आचरणात आणा. खरी शिवभक्ती काय असते हे राज ठाकरेंकडून शिका.”

या आंदोलनानंतर सिनेमागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. खरं तर, छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवीयाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच एका प्रेक्षकाला मारहाणही करण्यात आली आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी संबंधित शो पुन्हा सुरू केला.