दापोली – दिवाळीच्या सुट्ट्या आणि पाडव्याच्या उत्सवी वातावरणामुळे दापोली तालुक्यातील किनारपट्टीवर पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. विशेषतः हर्णे बंदर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी होत आहे. तर बंदर परिसर जत्रेसारखा गजबजलेला दिसत होता.
हर्णे बंदर हे दापोली तालुक्यातील सर्वात मोठे मासळी केंद्र असून, येथे पर्यटक मोठ्या उत्साहाने ताजी मासळी खरेदी करताना दिसतात. मासळी खरेदीतून दररोज लाखोंची उलाढाल होत असून, स्थानिक मच्छीमार महिलांना याचा चांगलाच आर्थिक फायदा होत आहे. हर्णेतील प्रसिद्ध चिमणी बाजार हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण ठरत असून, येथे होणाऱ्या ताज्या मासळीच्या लिलावाचा अनुभव घेण्यासाठी अनेक जण उत्सुकतेने सहभागी होत आहेत.
कोळंबी, सुरमई, पापलेट, बांगडा, म्हाकुळ, म्हाकुळ, बग्गा या जातींना सर्वाधिक मागणी असून, लिलावावेळी पर्यटकांना ‘सीफूड मार्केट’चा अनोखा आणि थरारक अनुभव मिळतो आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मासळीची आवकही मुबलक झाल्याने खवय्यांची चांगलीच चंगळ उडाली आहे.
दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दाभोळ ते केळशी किनारपट्टीवरील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स फुल्ल क्षमतेने भरले आहेत. कोकणी चविच्या ‘झिंगा फ्राय’, ‘पापलेट थाळी’, ‘सुरमई थाळी’, ‘कोळंबी बिर्याणी’, ‘खेकड्याचा रस्सा’ आणि ‘मच्छीफ्राय’ यांसारख्या स्वादिष्ट डिशेसचा मोह पर्यटकांना आवरत नाही. अनेक पर्यटक बंदरातून ताजी मासळी खरेदी करून ती थेट रिसॉर्टमध्ये तयार करून चवीने आस्वाद घेत आहेत.
“दापोलीला आलो आणि हर्णे बंदरातली ताजी मासळी खाल्ली नाही, असं होऊच शकत नाही,” असे पर्यटक आनंदाने सांगत असून, हर्णे बंदर परिसर सध्या पर्यटक आणि मासळीप्रेमींच्या उत्साहाने अक्षरशः ‘जिवंत’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
