भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने महाविकासआघाडी सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांवर आरोप केले आहेत. नुकतेच त्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. मात्र, त्यावर लागलीच हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला. तसेच, त्यांना प्रत्युत्तर दिलं. आज किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्या जावयावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच, “ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळा करण्याची एक कला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी विकसित केली आहे”, असं देखील सोमय्या म्हणाले. त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.

“मी सारखं सांगत होतो की माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातलं काहीतरी काढा. मग त्यांनी एक जावईशोध लावत घोटाळा काढला. मी त्यांना सूचना करेन, की माझ्या जावयाचं आणि माझ्या कुटुंबीयाचं नाव ते सातत्याने घेत आहेत. त्याचा कशाशीही संबंध नाही. आपला व्यवसाय करणाऱ्या एका माणसाचं नाव बदनाम करण्याचं काम ते करत आहेत. हे निषेधार्ह आहे”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

“सोमय्यांनी हा कोणता जावईशोध लावला?”

“किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या संबंधित योजनेसासाठीचा निधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्यांच्या स्वनिधीतून उभा करणार होते. त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये कोणतीही भूमिका ठेवलेली नाही. भ्रष्टाचारच करायचा असता, तर राज्य सरकारने स्वत:कडे पैसे घेऊन दिले असते. पण हे मार्गदर्शक पद्धतीचं काम होतं. १० मार्च २०२१ ला कंपनीला ऑर्डर दिल्यानंतर एकही ऑर्डर कंपनीला मिळालेली नाही. मग हा १५०० कोटींच्या घोटाळ्याचा कोणता जावईशोध सोमय्यांनी लावला? त्यामुळे किरीट सोमय्यांचा हा आरोप सुद्धा ओम फस्स झाला आहे”, असं मुश्रीफ म्हणाले.

“हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने १५०० कोटींचा घोटाळा केला आहे. ही कला पण वेगळीच कला आहे. मुश्रीफांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याच्या कामाचे टेंडर स्वतःच्या जावयाच्या कंपनीलाच दिले. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपन्यांमधून पैसे आले. ग्रामविकास खात्याने सगळ्या ग्रामपंचायतींसाठी निविदा काढल्या, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

..म्हणून मला टार्गेट केलं जातंय!

दरम्यान, आपण भाजपाविरोधी बोलत असल्यामुळेच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं मुश्रीफ म्हणाले. “मी सातत्यपूर्ण भाजपाच्या विरोधात बोलतो, म्हणून आवाज दाबण्यासाठी कारवाई सुरू आहे. मला आश्चर्य वाटतं की काहीही पुरावे नसताना ते काहीही बडबडत जातात. पवार साहेब आणि मुख्यमंत्र्यांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे. आता चौथा घोटाळा, पाचवा घोटाळा म्हणू देत. मी आता प्रतिक्रियाच देणार नाही”, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.