शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांचे स्मरण करत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, “गट वैगरे काही नाहीए असं मी मानतो, या गटाच्या गोष्टी तुम्ही करतात देश नाही करत, भाजपावाले करत असतील ज्यांनी हा गट बनवला आहे. त्यांनी बाळासाहेबांशी बेईमानी केली. आज बाळासाहेबांची जयंती आहे, बाळासाहेबांनी महाराष्ट्राला विशेषकरून मराठी माणसाला एक मंत्र दिला की महाराष्ट्रासाठी काम करा. स्वाभिमानाने जगा आणि हाच मंत्र अन्य राज्यातही गेला आहे.”

हेही वाचा – “स्मारकं होतील, पुतळे उभे राहतील, तैलचित्रांचे अनावरण होतील, राजकारण होईल पण…” बाळासाहेबांचे स्मरण करत संजय राऊतांचं विधान!

याशिवाय, “बाळासाहेबांनी काय म्हटलं होतं, की मी महाराष्ट्रात राहता मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, भूमिपूत्र आहे मला इथला हक्क मिळाला पाहिजे. हाच मंत्र बाळासाहेबांनी आणखी राज्यांसाठी दिला. बाळासाहेब काय म्हणाले, जर महाराष्ट्रात जय महाराष्ट्र म्हणतो तर मी पंजाबमध्ये जाऊन जय पंजाब म्हणेण. जय बिहार, जय उत्तर प्रदेश म्हणेण. प्रत्येक राज्याला आपली अस्मिता आणि स्वाभिमान आहे. तिथले जे बेरोजगार आहे तिथे त्यांनाच कामधंदा मिळाला पाहिजे. हा बाळासाहेबांचा मंत्र होता.” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

याचबरोबर, “बाळासाहेबांनी नेहमीच जे श्रमिक, कष्टकरी आहेत, घाम गाळणारे लोक आहेत, त्यांचा आवाज उचलला. बाळासाहेब नक्कीच मराठी माणसाचे हृदयसम्राट होते, परंतु हिंदुत्वाबाबत बाळासाहेबांनी जे काम केलं आहे, यासाठी लोक त्यांना हिंदुहृदयसम्राट मानतात.” असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.