जालना : पुणे जिल्ह्य़ातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे राज्यातील पहिला झिका रुग्ण आढळला असला तरी फार काळजी करण्याचे कारण नाही. पुणे येथील एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने या संदर्भात तपासणी केलेली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे सांगितले.

झिका संसर्ग झालेली रुग्ण ५० वर्षे वयाची महिला आहे. तिला हा संसर्ग झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने ३० जुलै रोजी दिला. एडिस इजिप्ती डासांपासून या आजाराचा प्रादुर्भाव होतो. या आजाराचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झालेला नसून राज्याची आरोग्य यंत्रणा या अनुषंगाने काळजी घेत असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे टोपे यांनी सांगितले.

साडेतीन हजार लोकसंख्येच्या बेलसर गावात जुलैच्या प्रारंभापासून ताप आलेले रुग्ण आढळून येत होते. त्यापैकी पाच नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले असता त्यापैकी तीन रुग्णांना चिकनगुनिया झाल्याचे निदान झाले. २७ ते २९ जुलैदरम्यान एनआयव्हीच्या डेंग्यू आणि चिकनगुनिया विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेलसर आणि परिचे गावांस भेट दिली आणि नागरिकांचे ४१ रक्तजल नमुने तपासणीसाठी घेतले.

त्यापैकी २५ जणांना चिकनगुनिया तर तीन जणांना डेंग्यू झाल्याचे प्रयोगशाळा तपासणीत स्पष्ट झाले. बेलसर येथील झिका संसर्ग आढळून आलेल्या महिलेस चिकनगुनियाही झालेला असल्याने तो मिश्र विषाणू संसर्गाचा रुग्ण आहे.आरोग्य विभागातील राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट दिली आहे.

राज्यात ९६ टक्के रुग्ण करोनामुक्त

३१ जुलैपर्यंत राज्यात ६० लाख ९० हजारांपेक्षा अधिक म्हणजे ९६.३२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जवळपास चार कोटी ८० लाख करोनाच्या प्रयोगशाळा चाचण्या आतापर्यंत झालेल्या आहेत. या तपासण्यांपैकी ६३ लाख तीन हजारांपेक्षा अधिक म्हणजे १३.१४ टक्के नमुने करोनाबाधित निघाले आहेत. ३१ जुलैपर्यंत राज्यात चार कोटी ४५ लाखांपेक्षा अधिक करोना प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले आहे. ३१ जुलै रोजी राज्यात तीन हजारांपेक्षा अधिक लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली.

लसीकरणावर भर

गेल्या दीड महिन्यापासून राज्यात दररोज पाच ते सात हजार नवीन करोना रुग्ण येत आहेत. जनतेने लसीकरण करून घेण्यावर भर द्यावा तसेच प्रामुख्याने ग्रामीण भागातील या संदर्भातील गैरसमज दूर झाले पाहिजेत.