संदीप आचार्य

भंडारा जिल्हा रुग्णालय दुर्घटनेनंतर सर्व जिल्हा रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ तात्काळ करण्याचा फतवा आरोग्य विभागाने काढला खरा मात्र सरकारने फायर ऑडिटसाठी ५० हजार रुपये उपलब्ध करून न दिल्यामुळे जवळपास एक हजार मनोरुग्ण असलेल्या ठाणे मनोरुग्णालयाला आजपर्यंत फायर ऑडिट करता आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रुग्णालय दुरुस्तीसाठीचा निधीही वारंवार मागूनही तो वित्त विभागाकडून देण्यात येत नसल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू विभागाला ९ जानेवारी रोजी लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून व गुदमरुन मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्व जिल्हा रुग्णालयांना तात्काळ फायर ऑडिट करण्यास सांगण्यात आले. ठाणे मनोरुग्णालयाला या फायर ऑडिटची सर्वाधिक गरज आहे कारण येथील तब्बल ११ इमारती या धोकादायक सदरात मोडत असून रुग्णालय शंभर वर्षांहून जुने आहे. ज्या इमारती धोकादायक नाहीत तेथील वीज पुरवठ्याची व्यवस्थाही जुनाट असल्यामुळे फायर ऑडिट अत्यावश्यक बनले आहे. मात्र, या ऑडिटसाठी लागणारा निधी मात्र सरकारने अद्याप दिलेला नाही. तात्काळ फायर ऑडिट करण्यासाठी ५० हजार रुपये लागणार असून आता १५ दिवसानंतरही ते देण्यात न आल्याने रुग्णालय प्रशासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अतिरिक्त संचालक (मानसिक आरोग्य) यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, रुग्णालयात १,०५० मनोरुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. ८०० खाटांच्या रुग्णालयात सध्या ३० कक्ष कार्यरत असून याशिवाय स्वयंपाक गृह, प्रयोगशाळा, प्रशासकीय इमारत तसेच एकूण ७१ फायर सिलेंडर आहेत.

ठाणे मनोरुग्णालयातील इमारत क्रमांक ११,१२,१३,१४,१५,१६,१८,१९,२० तसेच ३,५ व ८ क्रमांकाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने अलीकडेच दिला आहे. या इमारतींच्या दुरुस्तीऐवजी पाडून नव्याने बांधण्याची शिफारसही करण्यात आली आहे. तसेच दुरुस्तीसाठी किमान २४ कोटी रुपये खर्च येईल असेही आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या वयोगटातील मनोरुग्ण व मानसोपचाराची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे खरेतर नवीन मनोरुग्णालय उभारण्याची गरज आहे. तथापी ठाणे, पुणे, रत्नागिरी व नागपूर येथील मनोरुग्णालयांच्या दुरुस्तीसाठी व विस्तारासाठी पुरेसा निधी दिला जात नाही. तिथे नवीन रुग्णालय कसे उभारणार? असा सवाल आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी उपस्थित केला. ठाणे मनोरुग्णालयाचा विचार करता येथे २१० मंजूर पदे असून यातील ७६ पदे आजपर्यंत भरण्यात आलेली नाहीत. असलेल्या पदांपैकी बरीच पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली असून चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञांची २ पदे तर मनोविकृती तज्ज्ञांची ६ पदे रिक्त आहेत.

रुग्णालय दुरुस्तीसाठी तात्काळ निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांनी केली असून दुरस्ती न झाल्यास उद्या घडणार या दुर्घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहाणार नाही, असा स्पष्ट इशारा सहाय्यक अभियंत्यांनी २५ जानेवारी रोजी आरोग्य विभागाला एका पत्राद्वारे दिला आहे. तर दुरुस्तीसाठी लागणाऱ्या २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा यासाठी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी अनेकदा वित्तविभागाकडे पाठपुरावा केला. परंतू वित्त विभागाकडून निधीच उपलब्ध करून दिला जात नाही, असे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हे कमी ठरावे म्हणून फायर ऑडिटसाठीचे ५० हजार रुपये अद्यापी देण्यात आले नसल्याने फायर ऑडिटही होऊ शकले नाही.