पारनेर तालुक्यातील अल्पवयीन शालेय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी पहिल्याच सुनावणीला ते हजर होते.
गेल्या ऑगस्टमध्ये पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील शाळकरी मुलगी परीक्षा देऊन घरी जात असताना सायंकाळच्या सुमारास पाऊस आला म्हणून ती जवळच्याच एका पुलाखाली आश्रयाला थांबली होती. या वेळी तिच्या पाठलागावर असलेल्या तिघांनी तिला शोधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तिचा नंतर खून केला होता. या प्रकाराने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली होती. सुरुवातीला आरोपीचा तपास लागत नव्हता म्हणून भीतीमुळे येथील अन्य मुलींना शाळेत पाठवणेही पालकांनी बंद केले होते.
पारनेरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी गुन्हय़ाचा तपास करून संतोष लोणकर, मंगेश लोणकर (दोघेही रा. लोणी मावळा, ता. पारनेर) आणि दत्तात्रेय शिंदे (रा. अंबड, बीड) या तीन आरोपींना अटक केली होती. यात त्या वेळी पोलिसांनी ५५ जणांच्या साक्षी नोंदवल्या. आरोपींकडूनही गुन्हय़ात वापरलेल्या अनेक वस्तू आरोपींकडून जप्त करण्यात आल्या होत्या. तपासाअंती या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांच्यासमोर बुधवारी ही सुनावणी सुरू झाली. आरोपींचे वकील एच. एम. पठाण यांनी सरतपासणी घेतली.