अस्मानी संकटाचा प्रकोप अजूनही सुरूच आहे. रविवारी अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने जिल्हाभर हाहाकार उडवला. पावसासोबत तुफान वाऱ्याच्या माऱ्यामुळे जागोजागी मोठमोठी वृक्ष उन्मळून पडली. तसेच ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोन आठवडय़ाचा गारपिटीचा कहर आजही कायम होता. परभणी, पाथरी, जिंतुर या भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली.
दोन आठवडय़ापासून निसर्ग कोपला आहे. पावसाळ्यापेक्षाही भयावह परिस्थिती अवकाळीने निर्माण केली आहे. सलग दोन आठवडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्हाभर धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक गारांच्या माऱ्यामुळे रब्बी हंगाम उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करूनही अजून निसर्ग शांत झालेला नाही. आज रविवारी तुफानी वाऱ्यासह जिल्हाभर पावसाने हजेरी लावली. अनेक भागात गारांचा मारा झाला. परभणी शहरात दिवसभर अधुनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारी अडीचच्या दरम्यान वादळी वारे आणि गारा पडल्या. या सोबतीला विजांचा कडकडाटही होता.  पावसासोबत सुसाट वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. गंगाखेड रस्त्यावरील राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेसमोर असणाऱ्या हॉटेलवर झाड उन्मळून पडले. यामध्ये हॉटेलमधील बसलेल्यांपकी काही जणांना किरकोळ मार लागला. शहरातील बी. रघुनाथ सभागृहात असणारे िलबाचे झाडही या वाऱ्यामुळे उन्मळून पडले. शहरात अनेक ठिकाणी वाऱ्याने हाहाकार माजविला. भरदुपारीच शहरात अंधार पसरला होता. हीच परिस्थिती रात्रीपर्यंत कायम होती.
पाथरी तालुक्यात वाऱ्याने प्रचंड नुकसान
अवकाळीसोबत वादळी वाऱ्याने हाहाकार उडविला आहे. तालुक्यातील गुंज येथे वृक्ष अंगावर पडल्याने बल ठार झाला आहे. शनिवार रात्री वादळी वारा आणि गारांनी तालुका झोडपून निघाला आहे. बाभळगाव, उमरा, गुंज, अंधापुरी, लोणी, कानसुर या भागात प्रचंड गारपीट झाली. या गारपिटीला नष्ट करायला काहीही उरले नव्हते. यापूर्वीच झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील पिके नष्ट झाली आहेत. रब्बी पिकांसह या भागात असणाऱ्या टरबुजाच्या बागा, पपई, आंबा, चिकू या फळबागाही संपूर्णत: उद्ध्वस्त झाल्या आहेत. गुंज येथील जायकवाडी वसाहतीत नीलगिरीचे झाड उन्मळून रामभाऊ हारकळ या शेतकऱ्याचा बल ठार झाला. वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडून घरातील जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांबरोबरच घरांचेही नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पिकाबरोबरच गावांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान शनिवारी रात्री परभणी शहरासह जिल्हाभरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्री दहाच्या सुमारास आलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच केले होते. रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या.