सातारा: महाबळेश्वर शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला असून, पर्यटक या पावसाचा आनंद घेत आहेत. महाबळेश्वरमध्ये पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सध्या मोठी गर्दी झाली आहे. परिसरातील धबधबे फेसाळले असून, पावसामुळे निसर्ग सौंदर्य नयनरम्य झाले आहे. या ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. वेण्णालेकसह प्रमुख ठिकाणी पर्यटक या रिमझिम पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत. तालुक्यात भातशेतीसाठी अनुकूल वातावरण निर्मिती झाल्याने भातशेतीची लगबग पाहावयास मिळत आहे.

मात्र दाट धुके, जोरदार वारा वाहत असल्यामुळे हवेत गारठा वाढला आहे. पावसामुळे बाजारपेठेत पर्यटकांची वर्दळ कमी झाली आहे. सततच्या पावसामुळे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे पर्यटकांसह स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातूनही मार्ग काढत वाहतूक सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये १ जून ते २३ जुलैपर्यंत २७४९.३० मिमी पाऊस पडला आहे. मागील वर्षी या काळात २७०७.५० मिमी पावसाची नोंद झाली होती.