सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना स्थानिक परिस्थितीनुसार सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मालवण: खुडुपी आणि आचरा हिरलेवाडी येथे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक अंशतः थांबली आहे. तसेच, साळेल येथे झाड पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
कुडाळ आणि सावंतवाडी: दुकानवाड येथील पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर मार्ग: कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मांडूकली येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे.आंबोली आणि फोंडा घाटातील वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे.
नद्यांना पूर: जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कणकवलीतील वागदे गडनदी इशारा पातळीवर वाहत असून, ती इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. तसेच, खारेपाटण येथील वाघोटन नदीला पूर आल्याने इशारा पातळी ओलांडण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
तालुकानिहाय पाऊस (गेल्या २४ तासांत)
गेल्या २४ तासांत (सकाळी ८ वाजेपर्यंत) जिल्ह्यात सरासरी १०६.८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मिमीमध्ये: वैभववाडी २३०,देवगड: १३१.मालवण: ५८.सावंतवाडी: ९३.वेंगुर्ला: ६५.कणकवली: १२०.कुडाळ: ९८.दोडामार्ग: ६० एवढा नोंद झाला आहे. अतिवृष्टीमुळे भात शेती पिकाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.