महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात सुरू असणाऱ्या जोरदार पावसाने धरणांच्या पाणीसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. कोयना, धोम साठ टक्के तर बलकवडी पंचाहत्तर टक्के भरले आहे. मागील चोवीस तासांत महाबळेश्वर येथे आठ इंच पावसाची नोंद झाली.
मागील चोवीस तासांत या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर येथे १५४.६ मिमी (एकूण २८७०.३ मिमी), लामज १५० (४७७५.२), तापोळा १६८ (३७०६.८), पाचगणी २० (६६६.९), वाई ९.४ (२१८.२), खंडाळा २.५ (१३३.७) पावसाची नोंद झाली. या पावसाने धरणसाठय़ातही मोठी वाढ झाली आहे. कोयना ६१.५३ टीएमसी (१०५.२५ टीएमसी), धोम ७.५६ (१३.८), बलकवडी ३.१४ (४.०८), उरमोडी ८.८९ (९.८०), कण्हेर ८.०२ (१०.१०), तारळी ४.८९ (५.८५)असा धरणसाठा झाला आहे. धोम धरणाच्या पर्जन्यक्षेत्रात सतत सुरू असणाऱ्या पावसाने प्रतिसेकंद आठ हजार क्युसेक पाणी धोम धरणात जमा होत आहे. बलकवडी धरण ऐंशी टक्केपेक्षा जास्त भरले असून धरणात मोठय़ा प्रमाणात पाणी जमा होत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग असाच राहिला तर मध्यरात्रीच्या सुमारास बलकवडी धरणातून कृष्णा नदीतून धोम धरणात पाणी सोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तारळी धरणातही पाणी मोठय़ा प्रमाणात जमा होत असल्याने ३ हजार १८२ क्युसेक तर उरमोडीतून दोन हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वाई, मांढरदेव, भुईंज महामार्ग परिसरातही पावसाचा जोर कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in wai and mahabaleshwar
First published on: 31-07-2014 at 03:40 IST